रंगावली ! भारतीय संस्कृती दर्शविणारी प्रातांप्र...

रंगावली ! भारतीय संस्कृती दर्शविणारी प्रातांप्राताची रांगोळी (Rangoli Designs Of Different States Of India)

कविता नागवेकर  : 

रंगावली ! अमंगळाला आव्हान देणा-या रंगावली प्रतिकांमधून उमटलेली भारतीय संस्कृती..
लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली, उटण्याचा स्पर्श सुगंधी,
फराळाची लज्जत न्यारी, रंगवलीचा शालू भरजरी,
आली दिवाळी आली दिवाळी..

मनुष्यः उत्सवप्रियः|| दिव्यांच्या ओळीने सज्ज असलेला आणि मनुष्याला अत्यंत प्रिय असा हा दिवाळी सण. जीवनातील सर्व अधंकार दूर करण्यासाठी आणि लक्ष्मी देवीच्या आगमनाकरीता लोक घराच्या प्रवेशव्दारात रांगोळीसह दीप प्रज्वलित करतात. नेत्रसुखद अशी कलाविष्कारातून साकारण्यात आलेली रंगावली. मनाचा अचूक ठाव घेणारी कल्पनात्मक सौदर्यनिर्मितीतूनच साकारलेली अशी कलाकृती म्हणजे रांगोळी. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य, विशिष्ट सणवार, व्रतवैकल्य, निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे रेखाटली जाऊ लागली. अर्थातच, देवघरातील देवापुढे तसेच स्वयंपाकघरातील चुलीवर काढलेली रांगोळी आता परसदारातून मंडपातही पोहोचली. पावित्र्याचे प्रतिक असलेली रांगोळी ही सणासुदीच्या दिवशी जेवणा-याच्या ताटाभोवती, केळीच्या हिरव्यागार पानाभोवती तसेच तुळशीवृंदावनाभोवती किंवा कोणत्याही शुभप्रसंगी कार्यालयामध्ये रंगोळी रेखाटली जाते.

यास्तव भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचा अभ्यास या ग्रंथपंचकामध्ये श्री. परशुराम कृष्णा गोडे यांनी इ.स. ५० ते इ.स. १९०० या कालखंडातील रंगावलीचा इतिहास प्राचीन संस्कृत आणि प्राकृत स्तोत्रांच्या आधारे नोंदविला आहे. रांगोळची कला ही भारतात वेद पुराणातील उल्लेखानुसार आणि लिखित साहित्यानुसार दोन हजार वर्षापासून प्रचलित आहे असं म्हटलं जात आहे.

आपल्या सर्वांचे लाडके केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांनी असंच एका मुलीला अंगणात रांगोळी घालताना पाहून त्यांनी कविता लिहीली. ती मुलगी सूर्य, चंद्र, नक्षत्रे, स्वस्तिक, गोपद्म, सुदर्शन चक्र, बेल, फुले, तुळस, अशी सुबक रांगोळी काढत असताना गुणगुणत असताना या कवितेतून केशवसुतांना त्या मुलीच्या रांगोळीतून मंगलमय वातावरण सुचित होते.
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालाके अपुली प्रभा वितरली नेत्रोत्त्सवा त्यावर,
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली,
रांगोळी मग त्यास्थळीं निजकरें घालावया लागली

विविध प्रातांतील रांगोळ्या

लोककला ही सहज उमलणारी कला असून भारतात विविध प्रातांत रांगोळीच्या अनेक प्रकारासह शुभकार्यानिमित्त अनेक शुभचिन्हाचा वापर करुन सुरेख अशी रांगोळी रेखाटली जाते. जसे गोंड आदिवासी जमातीमध्ये सोहळयाप्रसंगी घराच्या प्रवेशव्दाराशी स्थैर्याचे प्रतीक म्हणून कासव रेखाटलेले असते.

त्याचप्रमाणे कोकण, बंगाल दक्षिण भारत य़ेथील परिसरामध्ये तांदुळाचे पीठ, भाताचे अतिरिक्त पाणी किंवा भाताची तुसे जाळून होणारी राखाडी त्याउलट राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश किंवा मध्यप्रदेश येथे पांढरी गारगोटी किंवा चुनखडीची पूड, गहू, ज्वारीचे पीठ रांगोळीसाठी वापरले जाते.शिवाय काही गावांमध्ये रांगोळीसाठी जमीन तयार करण्यासाठी गायीगुरांच्या शेणाचा वापर केला जातो.

तर मध्यप्रदेशातील आदिवासी लग्नसंमारंभात मातीच्या चौथा-यावर रांगोळी काढून सजवतात. ही रांगोळी ठिपक्यांची असून ठिपके विशिष्ट पध्दतीने रेघांनी जोडायचे व विविध आकृत्या तयार करायच्या. त्यासाठी रंग किंवा खडूचे चूर्ण पाण्यात भिजवून वापरतात. हे रंग बारीक काडीला कापूस लावून चौक भरतात.

तर केरळमध्ये विविध फुलांचा अधिकतर उपयोग करुन रांगोळी काढली जाते. पुविडल म्हणजे फुलांची आरास. श्रावणमासात नव्या पिकांच्या स्वागतासाठी दहा दिवसांचा ओणम उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी वर्तुळाकार, कमलपत्राकार इत्यादी प्रकारात प्रथम खडूने चित्र काढून त्यामध्ये फुले भरतात.

‘ऐपन’ म्हणजे उत्तराखंडातील कुमाऊँ प्रातांची खास म्हणून ओळख आहे. तेथे जमीन गेरुने सारवून तांदुळाच्या पिठाने आकृत्या रेखाटतात. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशात भगवान शिवाला महत्त्व दिले जाते. भगवान शंकराच्या पूजेप्रसंगी त्याच्या पिठासाठी (आसनासाठी) चौरस व त्याभोवती वाढत्या आकाराच्या चौरसांची चळत काढून मधोमध फुलीवर शिवलिंग स्थापिले जाते.

मुख्यतः या रांगोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ठिपक्यांची नक्षीदार रांगोळी आणि संस्कारभारती. वास्तविक, या रांगोळीमधून विविध प्रांतामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचं जतन वर्षानुवर्षे केले जात आहे. मूलभूत पारंपारिक प्रतिमांचा संयुक्त वापर करुन रंगोळी काढली जाते. जसे त्यामध्ये ठिपक्यापासून सुरु होणारी रेषा, वर्तृळ, अर्धवर्तुळ, नागमोडी रेषा, श्रृंखला या विविध  कृतीतून ध्वज, कलश, गोपद्य, स्वस्तिक, ओंकार, श्रीकार, पद्य, शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, धनुष्यबाण अशा अनेक आकारापासून सुशोभित सुरेख अशी रांगोळी रेखाटली जाते.

अशी पुर्वापार चालत आलेली सौंदर्य, सुशोभन आणि गुढरम्यता असलेली ही कला आजही भारतात टिकून आहे, आणि निरंतर टिकून राहील. तर चला मग ! दीपोत्सव करून आपल्या जीवनातील आणि घरातील अंधार दूर करूया..”दिव्यांची आरास मांडूनी, फुलली अंगणी रांगोळी, हर्ष फुलला मनी घेऊनी नवी स्वप्न”

ReplyForward