सौरव गांगुलींच्या बायोपिकमध्ये, रणबीर कपूर साका...

सौरव गांगुलींच्या बायोपिकमध्ये, रणबीर कपूर साकारणार दादांची भूमिका? (Ranbir Kapoor Likely To Play Dada In Sourav Ganguly Biopic)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या बायोपिकसाठी होकार दर्शविला आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर त्यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. याआधी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसह, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या आयुष्यावरही चित्रपट बनले आहेत.

क्रिकेटर सौरव गांगुलीच्या जीवनावर तयार होणाऱ्या या चित्रपटाचे बजेट 200 ते 250 कोटी रुपयां दरम्यान सांगितले जात आहे. याविषयी बोलताना सौरव गांगुलीने सांगितले “हो, मी बायोपिकसाठी होकार दिला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत असेल. दिग्दर्शकाचे नाव आत्ता तरी सांगणे मला शक्य नाही. सर्व बाबींना अंतिम स्वरुप येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.”

माध्यमातील वृत्तांनुसार सौरव गांगुलीच्या बायोपिकची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. या बायोपिकमध्ये दादाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता रणबीर कपूर अव्वल स्थानी आहे. याशिवाय इतर दोन नावांचीही चर्चा आहे.

रणबीर कपूरने यापूर्वी संजय दत्तच्या बायोपिकमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे. त्यामुळे तो सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी निर्मात्यांची पहिली पसंती असेल. याशिवाय हृतिक रोशनच्या नावाचीही चर्चा या भूमिकेसाठी सुरू आहे. दरम्यान बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत आपल्यासारखा दिसणारा एखादा अभिनेता असावा असे दादाने आपल्या मुलाखतीत सांगितले होते.

गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूच्या बायोपिकमध्ये ‘एमएस धोनी’, ‘मिल्खा सिंग’, ‘मेरीकॉम’, संदीप सिंग यांच्या आयुष्यावर ‘सूरमा’ असे चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी सायना नेहवालच्या आयुष्यावर ‘सायना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर लवकरच १९८३ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान कपिल देव यांच्या आयुष्यावर ‘८३’ हा चित्रपट येणार आहे.