रणबीर कपूर सातवीत असताना पहिल्यांदाच पडला प्रेम...

रणबीर कपूर सातवीत असताना पहिल्यांदाच पडला प्रेमात पण ब्रेकअप झाल्यावर गेला डिप्रेशनमध्ये (Ranbir Kapoor Fell in Love For The First Time in Seventh Class, Actor Went into Depression After Breakup)

बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूर लवकरच बाबा होणार आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि ऋषी कपूर यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या रणबीर कपूरचा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता. त्याला मोठे झाल्यावर अभिनेता व्हायचे होते. आणि त्याने आपले स्वप्न साकारही केले. त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे इंडस्ट्रीत नाव आणि प्रसिद्धी मिळवणारा रणबीर कपूर आपल्या अफेअर्समुळे देखील चर्चेत होता. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते.

रणबीर कपूरने एका मुलाखतीत आपले बालपण आणि पहिल्या प्रेमाविषयी सांगितले होते की, जेव्हा त्याच्या आई-वडिलांमध्ये भांडण व्हायचे तेव्हा त्या भांडणाचा माझ्यावर खूप परिणाम व्हायचा. आई नीतू सिंग आणि वडील ऋषी कपूर यांच्यातील भांडण कधी संपेल याची वाट पाहत मी अनेक वेळा पायऱ्यांवर बसून संपूर्ण रात्र काढायचो. रणबीर पुढे म्हणाला की, माझ्या आई-वडिलांच्या भांडणाचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मी माझ्या भावना दडवायला शिकलो.

 सुरुवातीला मला आईचा खूप लळा होता, परंतु माझे माझ्या वडिलांसोबतचे संबंध फारसे चांगले नव्हते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत एका चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून एकत्र काम केले, त्यानंतर हळूहळू वडिलांसोबत माझे नाते सुधारू लागले.

रणबीरने मुलाखतीत पुढे सांगितले की, मी शाळेत असताना पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो. तेव्हा मी सातवीत होतो. त्यावेळी मी त्या मुलीवर इतका मनापासून प्रेम करायचो की, जेव्हा ब्रेकअप झाला त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये गेलो. माझ्या आईवडीलांच्या लग्नामुळे नाते खूप गुंतागुंतीचे असू शकते हे मला समजले.

शाळेत पहिल्याच प्रेमात ब्रेकअप झाल्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो पण त्यातूनही मी स्वत:ला सावरले. आणि 10 वी नंतर अभिनयावर लक्ष केंद्रीत केले. रणबीरने 2007 मध्ये आलेल्या सांवरिया या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर त्याला चॉकलेट बॉय म्हणून ओळख मिळाली.

रणबीरच्या अफेअर्सबद्दल बोलायचे झाले तर 2008 मध्ये रणबीरने ‘बचना ए हसीनो’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान को-स्टार दीपिका पदुकोणला डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, वर्षभर डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. रणबीरने हे देखील अनेकदा स्पष्ट केले आहे की दीपिकासोबतचे ब्रेकअप दोघांच्या परस्पर संमतीने झाले आहे.

दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2009 मध्ये रणबीर कपूरने ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटातील त्याची को-स्टार कतरिना कैफला डेट करण्यास सुरुवात केली. 2013 मध्ये स्पेनमधल्या एका बीचवरील काही फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोंत रणबीर आणि कतरिना सहलीचा आनंद घेताना दिसत होते. या फोटोंमुळे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते, पण 2016 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला.

दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आलिया भट्ट त्याच्या आयुष्यात आली. दोघांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्नगाठ बांधली. चार वर्षे चाललेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. यानंतर 14 एप्रिल 2022 ला दोघांनी लग्न केले. आता लवकरच हे दोघे आईबाबा होणार आहेत.