रामायणातील रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेद...

रामायणातील रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी यांचं निधन (Ramayan’s Raavan Arvind Trivedi Dies Of Heart Attack)

एके काळी दूरदर्शन वरून प्रसारित झालेल्या ‘रामायण’ या अतीव लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकार करून घराघरात पोहोचलेले अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते व बऱ्याच काळापासून वृद्धापकाळाने उद्‌भवणाऱ्या विकारांशी झुंज देत होते.

अरविंदजी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी या बातमीस दुजोरा देत सांगितले की, “गेल्या काही वर्षांपासून आमचे काका सतत आजारी होते. गेल्या ३ वर्षांपासून तर त्यांची प्रकृती तोळामासा झाली होती. त्यांना २-३ वेळा हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. अखेरीस मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि कांदिवलीच्या राहत्या घरात त्यांचे निधन झाले.”

रामायणात राम आणि सीतेची भूमिका करणारे कलाकार अरुण गोविल व दीपिका चिखलीया यांनी व लक्ष्मणाची भूमिका करणारे सुनील लाहिरीने अरविंदजींच्या निधनावर शोक व्यक्त केला. शिवाय ‘अलविदा अरविंदभाई’ असे लिहून अमिताभ बच्चनने श्रद्धांजली वाहिली आहे.