राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे- पत्नी ...

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे- पत्नी शिखाने दिली माहिती (Raju Srivastava’s Wife Confirms He Is Stable, On Ventilator, ‘Want Your Prayers’)

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने कॉमेडियनच्या चाहत्यांना ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. आता एक महिना होत आला तरी त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झालेली नाही.

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना गेल्या महिन्यात जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून कॉमेडियनची तब्येत अतिशय नाजूक आहे. ते सध्या लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजू यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी दिली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कॉमेडियनचे चाहते ते  लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

काल कॉमेडियनचे प्रमुख सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, राजू यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. शुद्धीवर आल्यानंतर त्यांचे हात आणि पायांची हालचाल झाली.

राजू यांची पत्नी शिखाने ई-टाइम्सशी बोलताना सांगितले की, “मी एवढेच सांगेन की त्यांची प्रकृती स्थिर आहे पण ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. मेडिकल टीम शक्य तितके सर्वोत्तम उपचार करत आहेत. आपण सर्वांनी सुद्धा ते लवकर बरे होऊन आपल्यात परत येण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.”

हृदयविकाराच्या झटक्यानंतर राजू यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. गेल्या महिन्यात कॉमेडियनच्या मृत्यूच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. त्यानंतर राजू यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवने आपल्या इंस्टाग्रामवर राजूच्या चाहत्यांना केवळ कुटुंबाच्या वक्तव्यावर विश्वास ठेवण्याची विनंती केली.

 राजू श्रीवास्तव पहिल्यांदा दी ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज (2005) च्या पहिल्या सीझनमध्ये दिसले होते. या सीझनपासूनच त्यांच्या विनोदांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यानंतर त्यांनी बाजीगर, मैने प्यार किया,  आमदानी अठन्नी खर्चा रुपया आणि बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमध्ये काम केले होते.