प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती...

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, उपचारांना प्रतिसाद देत नाहीत (Raju Srivastava’s Health Update: Health deteriorates, unconscious for the past 25-30 hours, brain isn’t functioning, Comedian is still on ventilator)

टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले. पण त्यांना अजूनही शुद्ध आलेली नाही. तसेच त्यांचा मेंदू प्रतिसाद देत नसल्याचे बोलले जात आहे. त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार, चाहते त्यांची तब्येत सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबद्दल त्यांचा छोटा भाऊ दीपू श्रीवास्तवने सांगितले की, राजू यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून शुद्ध आलेलीच नाही. त्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. एम्सचे डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते त्यांच्या उपचारांना प्रतिसाद देत नसून त्यांच्या शरीरात आतापर्यंत कोणत्याही प्रकारची हालचाल दिसली नाही, त्यामुळे डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. राजू श्रीवास्तव यांना डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.

या आधी राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवने सुद्धा “त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, रुग्णालयात भरती केल्यापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा किंवा बिघाड असे काहीच झालेले नाही. सर्व मेडिकल टीम त्यांच्या उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आम्ही सुद्धा ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहोत असे म्हटले होते.

आपल्या विनोदांनी सर्वांना खळखळून हसायला लावणाऱ्या राजू श्रीवास्तव यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास होता. यापूर्वी त्यांची दोनदा अँजिओप्लास्टी झाली होती. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबेन अंबानी रुग्णालयात १० वर्षांपूर्वी त्यांची पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती, त्यानंतर 7 वर्षांपूर्वी मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांची पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात आलेली.

बुधवारी जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडली. ट्रेड मिलवर चालत असताना ते बेशुद्ध पडले, त्यानंतर जिममध्ये उपस्थित लोकांनी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली. यानंतर त्यांची प्रकृती सतत चिंताजनक आहे.