राजू श्रीवास्तवचा भाऊ दीपूने आपल्या भावाच्या प्...

राजू श्रीवास्तवचा भाऊ दीपूने आपल्या भावाच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणाऱ्यांना घेतले फैलावर, म्हणाला – काही निलाजरे लोक काहीही बोलतात… भावाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे (Raju Srivastava’s brother Deepu Slams People spreading rumours, Says- Few Shamless People Are Circulating False News… He is recovering)

गेल्या अनेक दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. विशेषत: गेल्या दोन दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांच्या मेंदूला सूज आली होती आणि रक्तदाबही सातत्याने घसरत होता. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केल्याचेही बोलले जात आहे. अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत अनेक माध्यमांनी ही बातमी शेअर केली होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत अनेक अपडेट्स येत आहेत आणि त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीबाबत अनेक अफवाही येत आहेत. या सगळ्या दरम्यान त्यांचा धाकटा भाऊ दीपू श्रीवास्तव याने त्यांच्या तब्येतीबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. यासोबतच अफवा पसरवणाऱ्यांबद्दल संतापही व्यक्त केला आहे.

या व्हिडिओमध्ये दीपू श्रीवास्तव म्हणाला की, “माझे मन खूप दुःखी आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवावासा वाटत नव्हतं, पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही निलाजरे लोक वाट्टेल ते पोस्ट करत असल्याचे मला समजले. म्हणून नाइलाजास्तव मला व्हिडिओसमोर यावे लागले. राजू भैय्या यांच्या कुटुंबाशी न बोलता, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता हे लोक पोस्ट करत आहे. मी एवढेच सांगेन की अफवांवर लक्ष देऊ नका.”

दीपू श्रीवास्तव पुढे म्हणाला, “तुमचे आवडते, आमचे मोठे भाऊ, गजोधर भैय्या, राजू जी हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक असलेल्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात, आयसीयूमध्ये आहेत. देशातील सर्वोत्तम डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. आपले 100% देत आहेत. जगभरातील लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि तुमच्या प्रार्थना काम करत आहेत. राजूजी बरे होत आहेत. माझा भाऊ लढवय्या आहे, लवकरच तो ही लढाई जिंकून परत येईल. आपल्या ‘कॉमेडीच्या दुकाना’सोबत परतणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, धीर धरा. डॉक्टरांची टीम सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि लवकरच आम्ही तुम्हा सर्वांना आनंदाची बातमी सांगू. तुम्ही फक्त प्रार्थना करत राहा. राजूजी लवकरच कॉमेडी शोसोबत आपल्यामध्ये परत येणार आहेत.”

दिपू श्रीवास्तव याने पुन्हा एकदा लोकांना फेसबुक पोस्ट्स आणि YouTube व्हिडिओंवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आणि केवळ कुटुंबातील सदस्यांकडून येणाऱ्या अपडेटवर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे. “जेव्हा कुटुंब अपडेट शेअर करेल, तेव्हा तुम्हाला कळेल. त्यामुळे दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. फक्त धीर धरा. राजूजी परत येतील.”

याआधी राजू श्रीवास्तवच्या पत्नी शिखा श्रीवास्तव यांनीही त्यांच्या पतीची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर चांगले उपचार करत असल्याचे निवेदन जारी केले होते. ते लवकरच बरे होतील. ती म्हणाली होती की, राजू जी एक सेनानी आहेत आणि लवकरच हे युद्ध जिंकून आपणा सर्वांमध्ये परत येतील. यासोबतच त्यांनी लोकांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते.