कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी ...

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी (Raju Srivastava Passed Away)

अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजू श्रीवास्तवचे आज बुधवारी सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या महिन्याभरुन अधिक काळापासून त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

कॉमेडीचा बादशहा अशी त्यांची ओळख होती. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्यांच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

राजू श्रीवास्तव हे १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. पण यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालवत गेली. यादरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त समोर आलं होतं. पण १८ ऑगस्टला दुपारच्या सुमारास त्यांच्या मेंदूनेही काम करणे बंद केलं. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. गेल्या महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.

90 च्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजू श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालनं मिळवलं होतं. मात्र त्यात सगळ्यात लक्षवेधी ठरले राजू श्रीवास्तव. राजू यांनी त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्यांचे नाव झाले. ते प्रेक्षकांच्या आवडीचे सेलिब्रेटी झाले होते. आता मात्र त्यांच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राजू यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यांनी मालिका, चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यांनी केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते.

राजू यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यांना मोठा हादरा बसला आहे. सोशल मीडियावरुन त्यांना लाखो चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजू केवळ कलाकार म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही ते प्रेरणादायी होते. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहे. राजूला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे.