राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही गंभीर, पण ...

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही गंभीर, पण ते परत येतील राजू यांच्या पत्नीने व्यक्त केला विश्वास (Raju Srivastava Extremely Critical, Wife Says- he is going to win this battle, Fans And Celebs Pray For Miracle)

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत अजूनही सुधार झाला नसून त्यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी त्यांचा ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले आहे. शिवाय त्यांच्या रक्तदाबाची पातळीही सातत्याने घसरत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हा एकमेव मार्ग आहे. राजू श्रीवास्तव लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांच्या कुटुंबापासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच चाहते प्रार्थना करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा श्रीवास्तव म्हणाल्या, “राजूजींची प्रकृती स्थिर आहे. राजूजी लवकर बरे व्हावेत म्हणून डॉक्टर आपले काम चोखपणे करत आहेत. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.राजू जी एक योद्धा आहेत त्यामुळे ते ही लढाई नक्कीच जिंकतील. ते लढतील आणि तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी परत येतील, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे. त्याचबरोबर मी हात जोडून लोकांना विनंती करते की कृपया राजूच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणे थांबवा. या अफवांमुळे कुटुंब, डॉक्टर आणि सर्वांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. डॉक्टर त्यांचे सर्वोत्तम योगदान देत आहेत. कृपया त्यांच्यावर नकारात्मकतेचा प्रभाव पाडू नका. आता आम्हाला प्रार्थनांची गरज आहे. नकारात्मक बातम्या पसरवणे थांबवा. या अफवा खूप त्रासदायक आहेत.”

शेखर सुमन सतत राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच इतरांनी सुद्धा राजू यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना कराव्यात असे आवाहन केले आहे.

राजपाल यादवने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने गेट वेल सून राजू भाई असे लिहिले आहे. आम्ही सर्व तुला मिस करत आहोत. व्हिडिओमध्ये राजपाल यादव म्हणाला, लवकर बरा हो राजू, माझ्या भावा, आम्ही सर्व तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत, तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत.तुझे कुटुंबीय, तुझे हितचिंतक तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. आता लवकर बाहेर ये म्हणजे आपण एकमेकांना मिठी मारू.

गीतकार मनोज मुंतशीर यांनीही राजू यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली असून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. मनोजने पोस्टमध्ये लिहिले- “राजू भाई, धीर सोडू नका. बस थोडा आणखी जोर लावा. आमचे हात सतत तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत. मनोजची इन्स्टा पोस्ट राजू यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे.

राजू श्रीवास्तवचा मित्र एहसान कुरेशीने इंस्टाग्रामवर राजू यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “राजू भाईची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी केवळ एक चमत्कारच त्याला वाचवू शकतो असे सांगितले आहे. तो चमत्कार होण्यासाठी तुम्ही सर्वांनी राजूसाठी प्रार्थना करा.

राजू यांच्या चाहत्यांना सुद्धा त्यांची खूप काळजी वाटत आहे. जूच्या प्रकृतीसाठी ते हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. राजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या पोस्ट करत आहेत.