राजू श्रीवास्तव यांची अनोखी प्रेमकहाणी (Raju Sh...

राजू श्रीवास्तव यांची अनोखी प्रेमकहाणी (Raju Shrivastav’s Love Story: Raju Srivastava Waited For 12 Years To Tie The Knot With His Lady-love Shikha, It Was Love At First Sight)

आपल्या विनोदाने  सगळ्यांना हसवणाऱ्या, सगळ्यांचे मनोरंजन करणाऱ्या राजू श्रीवास्तवने वयाच्या  58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजू  यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  पण आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.  मनोरंजन जगतापासून ते राजकीय वर्तुळात सर्वत्र दु:खाचे वातावरण आहे. राजू यांच्या अशा अचानक जाण्यामुळे त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू हॉस्पिटलमध्ये असताना त्या  त्यांच्या सावली प्रमाणे त्यांच्यासोबत होत्या. आज आम्ही तुम्हाला राजू आणि शिखा यांची प्रेमकहाणी सांगणारी आहोत. 

राजू श्रीवास्तव यांची प्रेमकहाणी सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती.  राजू श्रीवास्तवच्या पहिल्याच नजरेत शिखा मनात भरल्या होत्या.  त्यांना मिळवण्यासाठी राजू यांनी 12 वर्षे वाट पाहिली. 

राजू श्रीवास्तव यांची  शिखाशी पहिली मुलाखत त्यांच्या मोठ्या भावाच्या लग्नात झाली होती.  हे लग्न फतेहपूरमध्ये होणार होते त्यावेळी राजूच्या भावाची वरात कानपूर मधून गेली होती. या लग्नात राजू यांनी शिखाला पहिल्यांदा पाहिले आणि पहिल्याच नजरेत ते  त्यांच्या प्रेमात पडले.  त्याचवेळी त्यांनी ठरवलं लग्न केलं तर शिखाशी नाहीतर कोणाशीच नाही.

त्यांनतर त्यांनी शिखा बद्दल माहिती जमा करण्यास सुरूवात केली. शिखा या त्यांच्या वहिनीच्या काकांची मुलगी होती. आणि ती इटावा मध्ये राहायचा. त्यामुळे ते वरचेवर इटावा मध्ये जाऊ लागले. सुरवातीला त्यांनी शिखा यांच्या भावांचे मन जिंकले.

पण शिखाला आपल्या आयुष्यात सुखी ठेवायचे असेल तर आपल्याला आपले करिअर सुध्दा करावे लागेल. त्यासाठी ते मुंबईत आले. खूप स्ट्रगल केले. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. पण त्यांच्यात शिखा यांना मागणी घालण्याची हिम्मत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला लग्नाचा प्रस्ताव घेऊन शिखा कडे पाठवले.

त्यानंतर शिखाचे भाऊ मुंबईत आले आणि त्यांनी राजू बद्दल चौकशी केली, त्यांचे घर बघितले आणि मग नंतर लग्नाला होकार दिला. अशाप्रकारे १२ वर्षांनंतर आपल्यात प्रेमाची वाट पाहिल्यानंतर अखेर १९९३ मध्ये त्यांनी लग्न केले.

तेव्हापासून त्या दोघांनी गेली ती २९ वर्षे सुखाचा संसार केला. त्यांना दोन मुलं झाली आणि शेवटी आज त्याची ही साथ तुटली.