अभिनेता राजपाल यादवच्या संकटात वाढ, लाखो रुपयां...

अभिनेता राजपाल यादवच्या संकटात वाढ, लाखो रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप (Rajpal Yadav accused of cheating 20 Lakhs, police issued notice against the actor, earlier too actor was jailed in 5 crore fraud case)

बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या ‘भूलभूलैया 2’ चित्रपटाच्या यशामुळे खूप खुश आहे. चित्रपटातील त्याची विनोदी भूमिका लोकांना खूप आवडली. पण कदाचित त्याच्या या सुखाला कोणाची तरी नजर लागली आहे. राजपाल सध्या मोठ्या संकटात सापडला आहे.  त्याच्यावर लाखो रुपयांच्या घपल्यासोबत इतर काही गंभीर आरोप लागले आहेत. २० लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी इंदौर पोलिसांनी राजपालला नोटीस पाठवली असून १५ दिवसांत त्याला पोलीस स्टेशनला हजर राहायला सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुरिंदर सिंह नावाच्या एका बिल्डरने राजपाल यादव विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत राजपालने बिल्डरच्या मुलाला सिनेइंडस्ट्रीत पाठिंबा देण्यासाठी आणि त्याचे करीअर बनवण्यासाठी २० लाख रुपये घेतल्याचे म्हटले आहे. जेव्हा सुरिंदर राजपालकडे पैसे मागण्यासाठी गेले तेव्हा राजपाल जागेवर नव्हता तसेच तो त्यांचा फोनसुद्धा उचलत नव्हता. पैसे परत न मिळाल्याने बिल्डरने या प्रकरणात पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजपालला नोटीस पाठवून १५ दिवसांत पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे.

राजपालवर पैशांच्या घोटाळ्याचा आरोप लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१० मध्ये सुद्धा ५ कोटी रुपये परत न केल्याचा आरोप राजपालवर लागला होता. त्यावेळी राजपाल ‘अता-पता-लापता’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित करणार होता. त्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून ५ कोटी रुपये घेऊन ते लवकर परत करण्याचे वचन दिले. पण राजपालने ते पैसे परत दिलेच नाही. शेवटी त्या पैसे देणाऱ्या व्यक्तीने कोर्टात धाव घेतली. त्यावेळी कोर्टाने राजपालला त्या व्यक्तीचे व्याजासहित १० कोटी ४० लाख रुपये परत करण्याची शिक्षा केली. पण ते सुद्धा राजपालने परत केले नाही. त्यामुळे पुढे त्याला अटक करण्यात आली. काही दिवसांनी तो जामीनावर सुटला.

राजपालच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘अर्ध’ चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.