राजकुमार रावने खरेदी केले जान्हवी कपूरचे लग्झरी...

राजकुमार रावने खरेदी केले जान्हवी कपूरचे लग्झरी अपार्टमेंट (Rajkummar Rao Buys Luxurious Apartment From Janhvi Kapoor, Pays Swanky Amount)

बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या राजकुमार रावने स्वत:ला आपल्या प्रत्येक चित्रपटातून सिद्ध केले आहे. स्वत:च्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणे हे प्रत्येक बॉलिवूड अभिनेत्याचे स्वप्न असते. तसेच राजकुमार रावचेही होते जे त्याने पूर्ण केले. आता राजकुमारचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याने मुंबईतील एका पॉश विभागात महागडा अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजकुमारने आपली सहकलाकार जान्हवी कपूरकडून हे लक्झरी अपार्टमेंट विकत घेतले आहे. जान्हवी कपूरने आपले मुंबईतील जुहू येथील अपार्टमेंट राजकुमार रावला ४४ कोटी रुपयांना विकले असल्याचे बोलले जात आहे. ३४५६ स्क्वेअर फूट मोठ्या असलेल्या या फ्लॅटची किंमत प्रति स्क्वेअर फूट सुमारे १.२७  लाख असल्याचे बोलले जाते.

जान्हवी कपूरने डिसेंबर २०२० मध्ये मुंबईत ३९ कोटी रुपयांना हे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. इतक्या कमी वयात इतका महागडा फ्लॅट खरेदी केल्यामुळे जान्हवी तेव्हा खूप चर्चेत आली होती. मात्र आता तिने ते अपार्टमेंट राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांना अधिक किंमतीत विकले आहे.

खरेतर जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्यात ३१ मार्चलाच घराचा सौदा झाला होता. परंतु त्याची नोंदणी २१ जुलै २०२२ रोजी झाली आहे. जान्हवीने त्या घराच्या नोंदणीसाठी ७८ लाख रुपये दिले होते. राजकुमार रावने घर घेतल्याची बातमी पसरताच सोशल मीडियावर त्याला सर्वजण शुभेच्छा देत आहेत.

राजकुमार आणि जान्हवीने रूही या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता  पुन्हा एकदा ही जोडी मिस्टर अॅंड मिसेज माही या चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहे.