राजकुमार राव आहे अलिशान घर आणि महागड्या गाड्यां...

राजकुमार राव आहे अलिशान घर आणि महागड्या गाड्यांचा मालक, ऐशोआरामात जगतो आपले वैयक्तिक आयुष्य (Rajkumar Rao Lives a Luxurious Life, Actor is The Owner of a Luxurious House and Luxury Vehicles)

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत राजकुमार रावचे नावसुद्धा घेतले जाते. राजकुमार रावने ज्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्या चित्रपटांमधील अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यामुळेच इंडस्ट्रीत त्याचे वेगळे स्थान आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या राजकुमार रावचा ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. राजकुमार आपले वैयक्तिक आयुष्यही खूप ऐशोआरामात जगतो. तो अलिशान घर, महागड्या गाड्यांचा मालक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार राव करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे जवळपास 60 कोटींहून अधिक संपत्ती आहे. एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणाऱ्या राजकुमार रावला महागडा अभिनेता म्हणूनही ओळखले जाते. तो एका चित्रपटासाठी सुमारे 5 ते 6 कोटी रुपये घेतो. त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटासाठी त्याने 6 कोटी रुपये फी घेतल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटांमधून भरघोस कमाई करणारा राजकुमार राव वेब सिरीजसाठीही भरमसाट फी घेतो. याशिवाय तो ब्रँड आणि जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतो. राजकुमार राव ब्रँडसाठी 1 ते 2 कोटी रुपये घेतो. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत त्याची संपत्ती जवळपास 40 टक्क्यांनी वाढली आहे.

राजकुमार अनेकदा सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या घराचे फोटो शेअर करतो. त्या फोटोंवरुन त्याचे घर किती आलिशान आहे याचा अंदाज लावता येतो. अभिनेत्याचे मुंबईत आलिशान घर आहे. याशिवाय देशातील इतर शहरांमध्येही त्याची मालमत्ता आहे. मुंबईत शिफ्ट होण्यापूर्वी अभिनेता गुरुग्राममध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता.

आलिशान घराव्यतिरिक्त, अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. त्याच्याकडे 80 लाख रुपयांची ऑडी Q7आहे. याशिवाय त्याच्याकडे 37.96 लाख रुपयांची ‘मर्सिडीज CLA 200’ आणि 19 लाख रुपयांची ‘Harley Davidson Fat Boy’ बाइक आहे.

राजकुमार रावच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने ‘लव्ह सेक्स और धोखा’, ‘गँग्स ऑफ वासेपूर 2’, ‘तलाश’, ‘काई पो छे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याच्या ‘स्त्री’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती, याशिवाय 2013 मध्ये आलेल्या ‘शाहीद’ चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.