राजीव कपूरच्या संपत्तीसाठी, भाऊ रणधीर कपूर आणि ...

राजीव कपूरच्या संपत्तीसाठी, भाऊ रणधीर कपूर आणि बहीण रीमा जैन चढले आहेत कोर्टाची पायरी (Rajiv Kapoor Property Case: Bombay HC Seeks Undertaking From Randhir Kapoor & Rima Jain)

राज कपूर यांचे शेंडेफळ असलेला राजीव कपूर हृदयविकाराच्या झटक्याने फेब्रुवारी महिन्यात देवाघरी गेला. तो घटस्फोटित होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ रणधीर कपूर आणि बहीण रीमा जैन हे कायदेशीररित्या त्याच्या संपत्तीवर आपला हक्क मागत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला असता कोर्टाने त्यांना राजीवच्या घटस्फोटाचे कागदपत्र सादर करण्यास सांगितले.

यावर या दोघांनी कोर्टास सांगितले की, त्यांच्याकडे तसे कागदपत्र उपलब्ध नाहीत. बराच शोध घेतल्यावर मिळालेले नाहीत. कोणत्या फॅमिली कोर्टाने सदर घटस्फोट मंजूर केला होता, तेही त्यांना ठाऊक नाही. पण राजीवचा घटस्फोट सार्वजनिक स्तरावर माहीत आहे, अन्‌ लोकांच्या चर्चेत आहे. सबब घटस्फोटाचे कागदपत्र सादर करण्याबाबत आपल्याला सूट देण्यात यावी, अशी या दोघांनी कोर्टास विनंती केली.

या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या जस्टीस गौतम यांनी सूट देण्याची तयारी दर्शविली. पण त्याआधी दोघांना स्वीकृती पत्र देण्यास सांगितले.

याबाबत सांगण्यासारखी गोष्ट अशी की, राजीव कपूरने २००१ मध्ये आरती सबरवालशी लग्न केले होते. पण दोन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. म्हणून त्याच्या पश्चात भाऊ रणधीर व बहीण रीमा हे त्याच्या संपत्तीचे वारस ठरतात. कारण त्याचा आणखी एक भाऊ म्हणजे ऋषी कपूर गेल्याच वर्षी निधन पावला आहे. आणि राजीवने मृत्युपत्र केलेले नाही. आता या मुद्यावर कोर्ट काय आदेश देते, ते लवकरच समजेल.