उदरनिर्वाहासाठी पेंटींग विकून त्याने दिवस काढले...

उदरनिर्वाहासाठी पेंटींग विकून त्याने दिवस काढले, राजीव खंडेलवालचे संघर्षमय जीवन (Rajeev Khandelwal used to Sell Paintings to Survive, This Show Made Him a Star Overnight)

छोट्या पडद्यावरील सुपरहॉट अभिनेत्यांपैकी एक म्हणून राजीव खंडेलवाल याला ओळखले जाते. राजीव आता 47 वर्षांचा असून त्याने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केले. राजीवने बॉलिवूड चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. अनेक कलाकारांप्रमाणेच राजीवलाही सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला होता. त्याने आपल्या क्षमतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान मिळवले. संघर्षाच्या दिवसांत राजीवने उदरनिर्वाहासाठी पेंटिंग्ज विकण्याचे काम केले होते. त्यानंतर एका टीव्ही मालिकेने त्याला रातोरात स्टार बनवले.

राजस्थानमधील जयपूर शहरात 1975 मध्ये जन्मलेले राजीव खंडेलवाल याचे वडील भारतीय सैन्यात कर्नल होते. भावंडांमध्ये राजीव सर्वात लहान होता. त्याने सुरुवातीचे शिक्षण जयपूरमधून केले, पण पदवीचे शिक्षण घेण्यासाठी तो हैदराबादला गेला. त्याने आपल्या करीअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. मॉडेलिंगदरम्यान त्याने अनेक जाहिरातींमध्ये काम केले.

राजीव खंडेलवालच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा टप्पा खूप खडतर होता. त्याला मुंबईत उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागला. पैशांच्या कमतरतेमुळे अनेकदा उपाशी झोपावे लागले. पैशांसाठी राजीव सुरुवातीच्या काळात पेंटिंग्ज विकायचा. पुढे 1998 मध्ये टीव्ही शो ‘बनफूल’मुळे त्याच्या नशिबाचे दरवाजे उघडले. त्यानंतर त्यांच्या करीअरची गाडी सुसाट सुटली.

टीव्ही सीरियलमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला एकता कपूरचा सर्वात लोकप्रिय शो ‘कहीं तो होगा’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत राजीव खंडेलवाल याला मुख्य भूमिका मिळाली, त्यामुळे तो रातोरात स्टार बनला. या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत सुजलची भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

यानंतर राजीवला मागे वळून पाहावे लागले नाही. ‘कहीं तो होगा’ नंतर त्याला अनेक हिट शो मिळाले आणि त्यानंतर त्याने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. ‘आमिर’, ‘शैतान’, ‘साउंड ट्रॅक’ आणि ‘टेबल नंबर 21’ सारख्या चित्रपटांमध्ये राजीव दिसला आहे. याशिवाय त्याने ‘सच का सामना’ आणि ‘जज्बात’ सारख्या शोचे सूत्रसंचालन केले.

लाखो मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या राजीव खंडेलवालच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर, त्याने 2011 मध्ये मैत्रीण मंजरी कामतीकारसोबत लग्न केले. असे म्हटले जाते की अभिनेत्याने त्यांच्या साखरपुड्याच्या दिवशी गर्लफ्रेंड मंजरीला प्रपोज केले होते. यासोबतच त्याने तिच्या वडिलांना, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे असा मेसेज केला होता.

अभिनयाव्यतिरिक्त राजीव खंडेलवाल आपल्या फिटनेस आणि कमावलेल्या शरीरासाठी देखील ओळखला जातो. राजीव सध्या पडद्यावर क्वचितच दिसत असला तरीही,  त्याचा महिला चाहता वर्ग खूप मोठा आहे. सध्या, अभिनेता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. ‘हक से’, ‘मर्जी’ आणि ‘नक्षलबारी’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये तो दिसला आहे.