शिवचरित्रावर ३ भागात भव्य चित्रपट तयार करण्याचा...

शिवचरित्रावर ३ भागात भव्य चित्रपट तयार करण्याचा राज ठाकरे यांनी ‘अथांग’च्या ट्रेलर अनावरण प्रसंगी व्यक्त केला मनोदय (Raj Thackray Planning To Make A Film On Shivaji Maharaj In 3 Parts : Express His Desire At The Trailer Launching Of Marathi Web Series)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कलाप्रेम आणि शिवचरित्राचा अभ्यास सर्वज्ञात आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य असा ३ भागात चित्रपट तयार करण्याची प्रबळ इच्छा असल्याचा मनोदय त्यांनी काल रात्री व्यक्त केला. प्लॅनेट एमच्या अथांग या वेब सिरीजच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. वेब सिरीजमध्ये सध्या जे मुक्त वातावरण आहे, त्यावर बंधने घालावीत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, त्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अथांग या वेब सिरीजची निर्मिती अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने संतोष खेर यांच्यासह केली आहे. तिने या सिरीजच्या ट्रेलरच्या अनावरण प्रसंगी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली, तेव्हा ठाकरे यांनी वरीलप्रमाणे उद्‌गार काढले.

तेजस्विनीच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेता अशोकमामा सराफ तर प्लॅनेट एमचे अक्षय बर्दापूरकर यांच्या हस्ते राज ठाकरे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. आपल्या या पहिल्या कलाक्‌तीचे प्रदर्शन जवळ आल्याचा आनंद तिच्या बोलण्यातून व्यक्त झाला. या वेब सिरीजमध्ये भाग्यश्री मिलिंद, धैर्या घोलप, संदीप खरे, ऋतुजा बागवे, शशांक शेंडे, केतकी नारायण आणि उर्मिला कोठारे व निवेदिता सराफ यांच्या भूमिका असून दिग्दर्शन जयंत पवार यांनी केले आहे.

या मालिकेची संहिता आपण गेल्या ८ वर्षांपासून तयार करण्याच्या खटपटीत होतो. अखेरीस तेजस्विनी पंडित आणि अक्षय बर्दापूरकर यांनी माझ्यावर विश्वास दाखवून त्याची निर्मिती केली, असे पवार यांनी सांगितले आणि आपला आनंद व्यक्त केला. सदर मालिका २५ नोव्हेंबर पासून प्लॅनेट एम वर प्रदर्शित होणार आहे.