छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर २-३ चित्रपट...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर २-३ चित्रपट निर्माण करण्याचा राज ठाकरे यांचा मनसुबा : ‘हर हर महादेव’ च्या प्रदर्शनपूर्व कार्यक्रमात व्यक्त केले मनोगत (Raj Thackeray Intends To Produce 2-3 Films To Portray Chhatrapati Shivaji Maharaj : Reveals His Plans In The Pre-Release Live Chat Of ‘Har Har Mahadev’)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अत्यंत रोमहर्षक प्रसंग अर्थात्‌ पावनखिंडीच्या लढाईवर आधारित असलेला ‘हर हर महादेव’ हा भव्य चित्रपट ऐन दिवाळीत प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज्‌ आणि श्री गणेश मार्केटिंग ॲन्ड फिल्मस्‌ यांनी निर्माण केलेल्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे आहे की, तो मराठी, हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नड अशा पाच भाषांत तयार करण्यात आला आहे. अन्‌ या पाचही भाषांमधील चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करण्याचा विक्रम झी स्टुडिओज्‌ करत आहे. मराठी चित्रसृष्टीत असा आगळावेगळा प्रयोग यापूर्वी कधीही झालेला नाही. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका सुबोध भावेने तर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका शरद केळकर यांनी साकारली आहे.

देशपांडे यांची भूमिका शरद केळकर यांनी साकारली आहे. या चित्रपटात सदर शिवचरित्र ‘सह्याद्री’ सादर करतो, अशी संकल्पना आहे. कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शिवबांनी आपला पराक्रम गाजवला आहे. सह्याद्रीचा बुलंद आवाज अर्थात्‌ निवेदन महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रमुख यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या मराठी व हिंदी निवेदनाची झलक ‘हर हर महादेव’ च्या प्रदर्शनपूर्व कार्यक्रमात सादर करण्यात आली. या प्रसंगी सुबोध भावेने राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. जो झी स्टुडिओने ‘लाइव्ह’ प्रकाशित केला. सदर सुसंवादाला त्यांनी ‘शिवस्मरण’ असं नाव दिलं. त्यामध्ये राज ठाकरे यांनी ‘सह्याद्रीच्या व्हॉईस ओव्हरचे मजेदार शैलीत अनुभव कथन केले. त्याचप्रमाणे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक अभिजीत देशपांडे यांचेही कौतुक केले’

सुबोध भावे यांनी त्यांना विचारले की, जर आपण शिवाजी महाराजांच्या काळात असता तर काय व्हायला आवडलं असतं? त्यावर त्यांनी सांगितलं की, मला त्यांचा स्पर्श झाला असता तरी धन्यता वाटली असती.  शिवचरित्र म्हटले की, आपल्या सर्वांना आगऱ्याहून सुटका, अफझलखान वध, शास्तेखानावर हल्ला, राज्याभिषेक असे निवडकच प्रसंग ज्ञात आहेत. परंतु त्याही पलीकडे शिवचरित्र खूप मोठे व चांगले आहे. त्याचे वाचन करून कृती केली पाहिजे. तसेच निव्वळ महाराजांचे गोडवे न गाता आजकालच्या राजकारण्यांनी त्यांचे आचरण अंगिकारले पाहिजे. असेही विचार राज ठाकरे यांनी व्यक्त केले. तर अस्सल व चांगले शिवचरित्र हा एका चित्रपटाचा आवाका नसून मी स्वतः २ ते ३ भागात त्यांच्या जीवनावर भव्य चित्रपटांची आखणी करतो आहे, असा मनसुबा त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यांमधून ते निव्वळ राजकीय नेता नसून चित्रपट प्रेमी, व शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वाबद्दल अमाप आदर, आस्था आणिअभ्यास असल्याचे उपस्थितांना आढळून आले.  ‘हर हर महादेव’ या चित्रपटास त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट येत असताना आम्ही या चित्रपटात वेगळे काय देणार. अशी काही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. पण या चित्रपटातून छत्रपती हे स्वच्छ, शुद्ध व हळव्या मनाच माणूस म्हणून आम्ही चित्रण केले आहे.