राज कौशल यांना हार्ट अटॅक येणार याची आधीच जाणीव...

राज कौशल यांना हार्ट अटॅक येणार याची आधीच जाणीव झाली होती, पण ॲसिडिटी समजून दुर्लक्ष केलं… (Raj Kaushal Mistook Cardiac Arrest For Acidity And His Troubles Increased)

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं ३० जूनला पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. फिल्म मेकर आणि प्रोड्युसर असलेल्या राज कौशल यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त केली जातेय. पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास राज यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच, त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंब, मित्र आणि निकटवर्तीय अशा सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अवघ्या ४९ वर्षांचे राज एकदम स्वस्थ होते आणि मागच्या रविवारीच त्यांनी जहीर खान, सागरिका घाटगे, आशीष चौधरी, नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्यासोबत पार्टी केली होती.

त्यामुळे राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. या दरम्यान राज आणि मंदिराचे जवळचे मित्र म्युझिक डायरेक्टर सुलेमान मर्चेंट यांनी राजच्या तब्येतीबाबत काही माहिती शेअर केली ते म्हणाले , “29 जूनच्या संध्याकाळीच राजला अस्वस्थ वाटत होतं. त्यावेळेस त्यांना ॲसिडीटीचा त्रास वाटून त्यांनी पित्ताची काही औषधं घेतली आणि ते झोपी गेले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांनी मंदिराला त्यांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचं सांगितलं.” असं सुलेमान म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “राजने मंदिराला हार्ट अटॅक येत असल्याचं सांगताच तिने त्यांचा मित्र आशिष चौधरीला लगेचच फोन केला. आशिष मंदिराच्या घरी पोहचला. मंदिरा आणि आशिषने तातडीने राजला गाडीत बसवलं आणि ते रुग्णालयात निघाले. लिलावती रुग्णालयात कदाचित ते जात होते. यावेळी गाडीतच राजची प्रकृती अधिक खालावली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं. आणि पुढच्या ५-१० मिनिटांत राजच्या हृदयाचे ठोके थांबले होते. कदातिच तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. जेव्हा ते रुग्णालयात पोहचले तेव्हा डॉक्टरांनी राजला मृत घोषित केलं.” असं सुलेमान यांनी सांगितलं.

राज कौशल यांना या आधी ते अवघ्या ३०-३२ वर्षांचे असताना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. तेव्हापासूनच मंदिरा त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होती. त्यामुळे त्यांना मध्ये कधी त्याचा त्रास झाला नव्हता, असं सुलेमान यांनी सांगितलं.