राधिका आपटेने सगळ्यांसमोर आणलं बॉलिवूडचं धक्काद...

राधिका आपटेने सगळ्यांसमोर आणलं बॉलिवूडचं धक्कादायक सत्य, कधी नाकाची तर कधी स्तनाची सर्जरी करण्याचा दिला गेला सल्ला… (Radhika Apte Reveals Dark Secrets Of Bollywood, She Was Asked To Do Breast Implants And Plastic Surgery)

बॉलिवुड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) ही एक उत्तम अभिनेत्री आहे, यात दुमत नाही. तिने आपल्या बोल्ड व बिनधास्त अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनात आपले स्थान बनवले आहे. गेले एक दशक ती या चित्रपटसृष्टीत यशस्वीरित्या वावरत आहे. परंतु तिचा येथपर्यंतचा प्रवास सरळ नव्हता. कित्येकदा तिला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले आहे. अलिकडेच राधिकाने बॉलिवूडचं धक्कादायक सत्य सगळ्यांसमोर आणलं आहे.  

राधिका सध्या तिच्या आगामी ‘फॉरेंसिक’ (Forensic) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पार्च्ड सारख्या चित्रपटामध्ये बोल्ड भूमिका करणाऱ्या राधिकाने एका मुलाखतीमध्ये चित्रपट करत असताना आलेल्या वाईट अनुभवाबाबत खुलेपणाने सांगितलं. त्यात तिने करिअरच्या सुरुवातीपासून तिला तिच्या शरीरयष्टीवरून कसे टीकेला सामोरे जावे लागले तसेच नाकाची सर्जरी कर, स्तनाची सर्जरी कर असे सल्ले देण्यात आले, याबाबत सांगितले आहे.

राधिकाने सांगितले की, जेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला माझ्या शरीरयष्टीवर काम करण्याचा सतत सल्ला दिला जायचा. सुरुवातीला मी दबावाखाली जगले. पहिल्याच भेटीमध्ये नाकाची सर्जरी कर असं मला सांगण्यात आलं. तर दुसऱ्या भेटीमध्ये स्तनाची सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला.”

पुढे बोलताना ती म्हणाली, “हे सत्र पुढेही तसंच सुरु राहिलं. सर्जरी कर असा सल्ला मी कित्येकदा ऐकला. केसांना कलर करायलाच मला तीस वर्ष लागली. पण या गोष्टींसाठी मी साधं इंजेक्शन देखील घेणार नाही. मला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खूप राग यायचा. पण यामुळे मी माझ्या शरीरावर अधिक प्रेम करु लागले.”

सिनेसृष्टीत करिअर करताना सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे, हे राधिकाला माहीत होतं. परंतु तरीही तिने आपल्या दिसण्याबाबत कुठेही तडजोड न करता येथे यशस्वी होऊन दाखवलं. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या नटींसाठी हे उत्तम उदाहरण आहे.

आता राधिकाचा ‘फॉरेंसिक’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अभिनेता विक्रांत मेसीबरोबर ती या चित्रपटात काम करताना दिसेल. या व्यतिरिक्त ‘विक्रम वेधा’ हा चित्रपटही ती करत आहे, ज्यात तिच्यासोबत सैफ अली खान, हृतिक रोशनही मुख्य भूमिकेत आहेत.