करिअरच्या सुरुवातीला राधिका आपटेला लोकांनी दिले...

करिअरच्या सुरुवातीला राधिका आपटेला लोकांनी दिले होते अनाहूत सल्ले, ते ऐकून राधिका जाम संतापली होती… (Radhika Apte Received Such Advice At The Beginning Of Her Career, Upon Hearing Which The Actress Was Furious)

दमदार अभिनय आणि बोल्ड इमेज प्रस्थापित करून राधिका आपटेने चित्रसृष्टीत पाय रोवले आहेत. आज तिच्याकडे मोठे चित्रपट आहेत. अन्‌ तिच्यासोबत काम करायला नामांकित निर्माते-दिग्दर्शक आतुर झालेले आहेत. पण करिअरच्या सुरुवातीला तिला लोकांनी हिणवले होते, अन्‌ शरीरसंपदेवरून असे अनाहूत सल्ले दिले होते की, ही अभिनेत्री जाम संतापली होती.

दिसतं तसं नसतं… ही म्हण बॉलिवूडच्या कलाकारांना चांगलीच लागू पडते. इथे आज मान्यवर झालेल्या कलाकारांना यश चाखण्यासाठी फार काही सोसावं लागलं असतं. त्यापैकीच एक आहे राधिका आपटे. तिने आपल्यावर झालेल्या टिकेचा समाचार एका मुलाखतीमधून प्रगट केला आहे. ती म्हणते, “मी चित्रसृष्टीत नवी होते, तेव्हा मला चेहरा आणि शरीराच्या इतर भागांवर शस्त्रक्रिया करून घेण्याचे सल्ले दिले गेले होते. पहिल्याच भेटीत मला नाक बदलून घे, असं सांगण्यात आलं. तर दुसऱ्या भेटीत छातीवर शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला मिळाला होता.”

हा सिलसिला पुढे चालूच राहिला, असं सांगून राधिकानं म्हटलं आहे की, “तुझ्या पायाला आकार दे, जबडा नीट करून घे, असं सांगणारे महाभाग मला भेटले. काहींनी तर मला नितंबाच्या आकारावरून देखील बोल लावला… मला तेव्हा खूप राग येत होता. सगळ्यांनीच मला शरीराचे आकार बदलायला सांगितले. पण मी ते करू शकत नव्हते. कारण मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करते…”

राधिका २०१५ साली तेलगू चित्रपटातून आली. तो प्रदर्शित होण्याआधी तिचा न्यूड व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्याने इंटरनेटवर खळबळ माजवली. पण या व्हिडिओतली, ती मी नव्हेच, असा पवित्रा राधिकाने घेतला होता.