आर. डी. बर्मन यांची आज जयंती… आर. डी. व आ...

आर. डी. बर्मन यांची आज जयंती… आर. डी. व आशा भोसले यांची प्रेमकहाणी अशी रंगली होती… (R. D. Burman’s Birthday Today : Reminds The Love Story Of R. D. And Asha Bhosle)

सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन ऊर्फ पंचमदा यांनी हिंदी चित्रसृष्टीत आपल्या संगीताचा न पुसला जाणारा ठसा उमटवला आहे. त्यांना जाऊन २६ वर्षे झाली तरी, त्यांच्या मधुर संगीताचा, त्यांच्या चाहत्यांना विसर पडलेला नाही. पाश्चिमात्य तसेच शास्त्रीय ढंगाची त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही अजरामर आहेत. आज पंचमदा यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांचे जीवन आणि आशाताई भोसले यांच्या प्रेमकहाणीला उजाळा देत आहोत…

आर. डी. आणि आशाताई यांची पहिली भेट आर. डी.चे पिताजी व महान संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने झाली होती. तेव्हा राहुल कोवळ्या वयात होता. आणि आशाताईंचा चित्रसृष्टीत चांगलाच जम बसलेला होता.

त्यानंतर १० वर्षांनी राहुल व आशाताई ‘तिसरी मंझील’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले. या चित्रपटातील फिमेल व्हॉईसमधील सगळी गाणी राहुलने आशाताईंकडूनच गाऊन घेतली होती. हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले तेव्हा दोघांचेही पहिले लग्न मोडले होते. या चित्रपटानंतर आशाताई आर. डी. साठी सातत्याने गाऊ लागल्या. आर. डी. च्या संगीताने सजलेली आशाताईंची गाणी आजही लोकप्रिय आहेत. संगीताच्या प्रवासात एकमेकांना जास्तीत जास्त सहवास लाभत होता. आशाताईंनी एका खास बातचितीमध्ये सांगितलं होतं की, त्यानं मला प्रपोज करण्यासाठी गाण्याचा आधार घेतला होता. त्यामधून त्यानं आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं की, मेरे सुरों को तुम ही समझ सकती हो. त्याच्या भावना आशाताईंपर्यंत पोहोचल्या. पण दोघांच्या लग्नाला आर. डी. च्या आईचा सक्त विरोध होता… पण अखेरीस जमलं… पण त्यांचं हे वैवाहिक जीवन फक्त १४ वर्षातच संपुष्टात आलं. कारण वयाच्या ५४ व्या वर्षीच, आर. डी. ने या जगाचा निरोप घेतला…

आर. डी. बर्मन यांनी संगीतकार म्हणून ‘छोटे नवाब’ या चित्रपटाने आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर बहारों के सपने, अमर प्रेम या चित्रपटातील सुरेल गाण्यांनी ते नावारूपास आले. ‘तिसरी मंझील’च्या उडत्या, पाश्चात्य सुरावटीच्या गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. तीच गोष्ट ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटाच्या बाबतीत घडली. चित्रपट गीतांच्या चाली आणि संगीत नियोजनात नवनवे प्रयोग करण्याचा त्यांना भारी छंद होता. त्यामुळे कमी वयातच त्यांनी चित्रसृष्टीत मोठे नाव कमावले आणि प्रचंड प्रमाणात चाहतावर्ग निर्माण केला. आजमिती त्यांच्या नावे हजारो वेबसाईटस्‌ निर्माण झाल्या आहेत.

जाझ, कॅब्रे, डिस्को गाणी द्यावीत ती आर. डी.ने आणि ‘चिंगारी कोई भडके’, ‘हमे तुमसे प्यार कितना’, ‘एक चतुर नार’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘अगर तुम ना होते’, ‘रिमझिम गिरे सावन’, ‘मिठे बोल बोले, बोले रे पायलिया’, ‘मेरा कुछ सामान.. मुझे लौटा दो’ यासारखी शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी द्यावी ती आर. डी. नेच, असा त्यांच्या अमर संगीताचा प्रवास आहे. ‘शोले’ चित्रपटाने जगभराच्या चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. त्याची गाणी आजही गुणगुणताना लोक दिसतात.