दिशाभूल करणारी जाहिरात केली म्हणून दक्षिणेचा अभ...

दिशाभूल करणारी जाहिरात केली म्हणून दक्षिणेचा अभिनेता अल्लू अर्जुन वर गुन्हा दाखल (‘Pushpa’ Fame Actor Allu Arjun In Trouble: Fir Filed Against Him For A Misleading Advertisement)

साउथकडील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन गेले काही दिवस त्याच्या पुष्पा चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटातील त्याचा अभिनय आणि नृत्य प्रेक्षकांना फार आवडले. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सध्या अल्लू अर्जुनची वेगळ्याच कारणामुळे चर्चा सुरु आहे.

एका शैक्षणिक संस्थेला समर्थन दिल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संस्थेच्या जाहिरातीत अल्लू अर्जुनचा चेहरा वापरुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून ती जाहिरात चूकीची असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते  कोठा उपेंद्र रेड्डी यांनी केला.

या जाहिरातीत अल्लू अर्जुन दिसल्यामुळे त्याच्या विरोधात आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेने खोटी माहिती दिल्याबद्दल त्या संस्थेविरोधात अंबरपेट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्लू अर्जुन आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेने लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करावा अशी विनंती कोठा उपेंद्र रेड्डी यांनी केली.

जाहिरातींमुळे अडचणीत येण्याची अल्लू अर्जुनची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी एका फूड डिलीव्हरी अॅपचे मार्केटींग केल्याप्रकरणी तो अडचणीत सापडला होता. याशिवाय त्याला सरकारी परिवहन सेवांची अवहेलना करुन एका बाइक अॅपला पाठिंबा दिल्याबद्दल ताकीदसुद्धा देण्यात आली होती.

अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो पुष्पाच्या पुढील भागाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर वेणु श्रीराम सोबत आयकॉन हा चित्रपट करणार आहे.