पुण्यात रंगला ‘बॉईज ३’चा संगीत सोहळ...

पुण्यात रंगला ‘बॉईज ३’चा संगीत सोहळा (Pune Audience Witnessed Great Musical Event Of Marathi Film Boyz 3)

‘बॉईज’, ‘बॉईज २’ च्या यशानंतर आता ‘बॉईज ३’ हा चित्रपट लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी ब्लॉकबस्टर ‘बॉईज ३’चा संगीत अल्बम चांगलाच चर्चेचा विषय ठरला. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ३’ चित्रपटातील गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.

‘बॉईज’ व ‘बॉईज २’ मधील गाण्यांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनातून उतरलेली नाही. ‘लग्नाळू’, ‘गोटी सोडा’ ही गाणी डान्स, पार्टींमध्ये हमखास वाजवली जातात. बॉईज 3 मधील नवीन ‘लग्नाळू २.०’ हे गाणेसुद्धा पुन्हा एकदा सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावत आहे.

‘बॉईज ३’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुण्यात भव्य दिव्य संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ‘बॉईज ३’ भव्य संगीत सोहळ्यात चित्रपटातील सुपर हिट गाण्यांची मैफिल रंगली होती.

हजारो लोकांनी भरलेले सभागृह, टाळ्यांचा कडकडाट, वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला कमालीचे गायक यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी आनंददायी ठरली. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते सह अनेक गायकांचा सहभाग होता तसेच नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढली.

या संगीत सोहळ्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणाले, ” ‘बॉईज’ व ‘बॉईज २’ ला जसं प्रेम प्रेक्षकांनी दिलं तसंच ‘बॉईज ३’ ला ही मिळेल याची खात्री आहे. ‘बॉईज ३’ची ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडत असून, त्यावर चर्चा होत आहे याचा मला आनंद आहे. ‘बॉईज ३’ चित्रपटातील गाण्यांवर लोक थिरकत  आहेत. चित्रपटामध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत. लवकरच सर्व गाणी प्रेक्षकांच्या समोर येतील. ‘बॉईज ‘ व ‘बॉईज २’ला  प्रेक्षकांचा जसा उत्तम प्रतिसाद मिळाला तसाच ‘बॉईज ३’च्या अल्बमला देखील मिळेल, अशी मला आशा आहे.”