‘धर्मवीर’ चे निर्माते मंगेश देसाई यांच्या मोटार...

‘धर्मवीर’ चे निर्माते मंगेश देसाई यांच्या मोटारीला अपघात: सुदैवाने ते सुखरुप (Producer Of Block Buster Marathi Film Dharmaveer Survives In A Car Accident )

सध्या सर्वत्र पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता अभिनेता आणि निर्माता मंगेश देसाई यांना अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण गाडीचे खूप नुकसान झाले आहे. हा अपघाच वाशी येथील कोकण भवनाजवळ झाला. गाडीचा अचानक ब्रेक लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते. मंगेश देसाईंचा अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नातेवाईक आणि चाहते फोन , मेसेजद्वारे त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करु लागेल.

त्यांच्यासाठी मंगेश देसाई यांनी एक पोस्ट शेअर करत ते सुखरुप असल्याचे सांगितले. मंगेश देसाई यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, आज झालेल्या अपघातामध्ये फक्त गाडीचं नुकसान झालं आहे, ईश्वर कृपेने आम्ही सुखरुप आहोत. काळजी नसावी, धन्यवाद. त्यांची ही पोस्ट वाचल्यावर चाहत्यांच्या जीवात जीव आला.

अभिनेता मंगेश देसाई यांनी धर्मवीर चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटात त्यांना तुफान यश मिळाले. धर्मवीर चित्रपटासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याआधी त्यांनी एक अलबेला, खेळ मांडला या चित्रपटात काम केले आहे.