गुढी उभारताना…(Procedure To Be Followed I...

गुढी उभारताना…(Procedure To Be Followed In Displaying Gudhi)

महाराष्ट्रात गुढीपाडवा सण विशिष्ट प्रकारे साजरा केला जातो. पहाटे लवकर उठून अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान केलं जातं. मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं. दारासमोर रांगोळी घालून गुढी उभारली जाते. पहाटे कडुनिंबाची विशिष्ट पद्धतीने तयार केलेली गोळी आणि नंतर गोडाधोडाचं जेवण केलं जातं. अशा प्रकारे गुढीपाडव्याचा सण पूर्वापार साजरा होत आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शक आणि विक्रम संवत यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय सौरपंचांगाची कालगणना या दिवसापासून सुरू होते. हा दिवस म्हणजे मराठी महिन्यातील पहिला महिना असणार्‍या चैत्र महिन्याची सुरुवात असते. बांबूच्या टोकावर जरतारी वस्त्र, त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवलेला, आंब्याच्या किंवा कडुनिंबाच्या पानांचं लहानसं तोरण आणि साखरपार्‍याची माळ ल्यायलेली गुढी घरोघरी उभारली जाते. पौराणिक साहित्यामध्ये आनंद प्रसंगी गुढ्या-तोरणं उभारल्याचे अनेक उल्लेख आढळतात. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक… विजय पताकाच! ही गुढी कशी उभारावी आणि कशी उतरवावी याबाबत जाणून घेऊ या.
उत्तुंग आणि अथांग


साधारण सहा ते दहा फूट लांबीचा बांबू यासाठी स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यावर रेशमी वस्त्र लपेटून, त्या वस्त्रावर चांदीचा किंवा पितळेचा कलश उपडा ठेवावा. या विजय ध्वजावर सुगंधी फुलांची, साखरपार्‍याची माळ आणि आंब्याच्या किंवा कडुनिंबाच्या पानांचं तोरण घालावं. ही गुढी दारात थोडी तिरकस उभारतात. अशी ही गुढी विजयाच्या थाटातच उभारली जायला हवी.
आपली गुढी हे अनेक गोष्टींचं द्योतक आहे. गुढीसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बांबूची किंवा कळकाची काठी वापरली जाते. ही काठी म्हणजे एका दृष्टीने पर्यावरणाचं, वृक्षवेलींचं अस्तित्व टिकवण्याचं साधन आहे. आपण गुढी आकाशाच्या दिशेने उभारतो. आपली महत्त्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अथांग असावी असा संदेश जणू ही गुढी आपल्याला देत असते. ही गुढी विजयाचं, केलेल्या तपाच्या साफल्याचं प्रतीक आहे. गुढीमध्ये वापरलं जाणारं कडुनिंब, साखरेची माळ आणि रेशमी वस्त्र ही मानवाच्या तीनही गरजांची प्रतीकं आहेत. चैत्रपालवीत नटणार्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी वातावरणात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने गुढी उभी करण्याची आपली परंपरा आहे.
निसर्गाचा उत्सव
सायंकाळी गुढी उतरवताना पुन्हा देवाची आणि निसर्गाची प्रार्थना केली जाते. आमच्याकडे पाऊस नियमित येऊ दे, आम्हाला भरपूर आणि शुद्ध पाणी मिळू दे अशी प्रार्थना केली जाते. यासाठी देवादिकांची, निसर्गाची पूजा केली जाते. गुढीपाडवा हा निसर्गाचा उत्सव आहे. त्यामध्ये वसंतवैभव फुलतं. इतर 11 महिन्यांमध्ये न दिसणारं निसर्गवैभव या दिवसात असतं. ऋतुराज वसंताचं आगमन झाल्यावर सार्‍या सृष्टीला जणू चैतन्याची पालवी फुटते. या दिवसात झाडावेलींची कोवळी पालवी बाळसं धरू लागते. ही पालवी टिकू देऊन झाडं वाढवली तर झाडं बहरून येतात. असे वृक्ष असतील तर प्राणी टिकतात. केवळ माणूसच नाही तर वन्यप्राणीही या वृक्षांमुळेच टिकून आहेत. गुढीपाडवा हे त्याचंच प्रतीक आहे. गुढीपाडवा हा चैतन्याचा, समृद्धीचा उत्सव आहे. या काळात आपल्या दारात गुढी उभी करून चैत्राचं स्वागत केलं जातं.