बॉलिवुडमध्ये पक्षपातः प्रियंका चोप्राने टाकला प...

बॉलिवुडमध्ये पक्षपातः प्रियंका चोप्राने टाकला प्रकाश (Priyanka Chopra Talks About Bias And Monopoly In Bollywood)

देसी गर्ल प्रियंका चोप्रा लिखित ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक सध्या चर्चेचा विषय बनले आहे. प्रियंकाने या पुस्तकामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत. प्रियंका चोप्रा आज एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जात आहे, परंतु तिलाही बॉलिवुडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. प्रियंकाने आपल्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकामध्ये बॉलिवूडमधील पक्षपात आणि मोनोपोलीबाबत खुलेपणाने लिहिले आहे.

‘ए लिटिल लेट विद लिली सिंह’ या लिली सिंहच्या चॅट शोमध्ये पाहुणी म्हणून गेलेल्या प्रियंकाला असे विचारण्यात आले होते की, बॉलिवूडमधील पक्षपातीपणामुळे तिला कधी स्वतःच्या करिअरमध्ये समस्यांना सामोरे जावे लागले आहे का? आणि या प्रश्नाचे उत्तर प्रियंकाने ‘हो’ असे दिले. एवढंच नाही तर ‘अनफिनिश्ड’ या माझ्या पुस्तकामध्येही मी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे असे तिने सांगितले. लिली सिंहच्या शोमध्ये पुढे ती म्हणाली,”बॉलिवूडमधील पक्षपाताचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे …. हेच बरोबर आहे, इथे प्रत्येक जण आपल्या परिवारास प्राधान्य देऊ इच्छितो. आपण सर्वच आपलं कुटुंब तसेच मित्रांचा विचार करतो. त्यांच्यासाठी संधी उपबद्ध करून द्यायला सगळ्यांनाच, अगदी मलाही आवडेल. परंतु परिवार आणि मित्रांना मदत करण्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही इतरांसाठी पुढे येण्याचे मार्ग बंद करावे.” मला असं वाटतं की, “ज्यांच्याकडे एक मोठं टेबल आहे… त्यांनी आपलं टेबल अजून मोठं करण्यास काय हरकत आहे?… परंतु असं न होता हे लोक त्या टेबलवर स्वतःचा हक्क दाखवतात. आपल्या टेबलवर इतरांना बसण्यासाठी जागाच देत नाहीत, हा सरळसरळ पक्षपातीपणा आहे.”

लिली सिंहच्या ‘ए लिटिल लेट विद लिली सिंह’ चॅट शोमध्ये प्रियंका चोप्राने काय म्हटले ते तुम्हीही ऐका…

मोठी स्वप्न पाहणाऱ्या आणि ती सत्यात आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणाऱ्या छोट्या शहरातील तरुणांसाठी बॉलिवूड स्टार प्रियंका चोप्रा अगदी योग्य उदाहरण आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हे प्रियंकाने दाखवून दिले आहे. प्रियंकाने २००० सालामध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकला आहे.

प्रियंका चोप्राने क्रिश, डॉन, कमीने, व्हॉट्स योर राशि, 7 खून माफ, बर्फी, मैरी कॉम, दिल धडकने दो, बाजीराव मस्तानी यासारख्या चित्रपटांतून आपलं अभिनय कौशल्य दाखवून बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये नाव मिळविले आहे. प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. प्रियंकाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार विभागातील फिल्मफेअर ॲवॉर्ड्‌स तसेच इतरही अनेक ॲवॉर्ड्‌स मिळाले आहेत. विदेशी बॉयफ्रेंड निक जोनस याच्याबरोबर लग्न झाल्यानंतर प्रियंका देश-विदेशातही आता लोकप्रिय झाली आहे.