‘निक जोनासची पत्नी’ असा उल्लेख झाल्...

‘निक जोनासची पत्नी’ असा उल्लेख झाल्याने प्रियंका चोप्राचा संताप : म्हणते – ‘महिलांना आजही अशी वागणूक?’ (Priyanka Chopra Slams Publication For Calling Her ‘Wife Of Nick Jonas’)

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आता निव्वळ बॉलिवूडच नव्हे तर ग्लोबल स्टार झालेली आहे. स्वतःच्या हिंमतीवर आणि कलागुणांवर तिनं हे स्थान मिळवलं आहे.

मध्यंतरी प्रियंका आणि तिचा पती निक जोनस यांच्या घटस्फोटाच्या चर्चेचे तारे काही प्रसिद्धी माध्यमांनी तोडले होते. पण प्रियंकाच्या आईने त्यांचा समाचार घेऊन आणि प्रियंकाने निकसाठी इन्स्टावर रोमॅन्टिक मेसेज प्रसिद्ध करून सर्व अफवांचे खंडन केले होते.

पण आता प्रियंकाचा, निक जोनसची पत्नी असा उल्लेख केल्याने ती संतापली आहे. ज्या प्रकाशनाने हे कृत्य केलं, त्यांच्या मजकुराचे स्क्रीन शॉट देऊन प्रियंकाने आपला राग व्यक्त केला आहे. सदर स्क्रीन शॉट शेअर करून प्रियंका म्हणते, ‘हा काय प्रकार आहे. मी आजवर आयकॉनिक फिल्म फ्रॅन्चाईजी म्हणून प्रमोट करत असताना, मला एका पुरुषाची पत्नी म्हणून संबोधित केले जात आहे…’

अन्य एका वृत्ताचा समाचार घेत प्रियंका म्हणते, ‘महिलांना आजही अशी वागणूक दिली जाते. कमालच आहे. माझ्या बायोमध्ये आयएमडीबी लिंक ॲड करू की काय?’ हा स्क्रीन शॉट शेअर करून प्रियंकाने आपला पती निक यालाही टॅग केले आहे.

प्रियंकाची नाराजी समजण्याजोगी आहे. कारण तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं आहे. मोस्ट ॲडमायर्ड वुमन – २०२१च्या टॉप १० यादीमध्ये स्थान मिळवलेली प्रियंका ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.