शरीरात होणारे बदल प्रियंका चोप्राने मोकळेपणाने ...

शरीरात होणारे बदल प्रियंका चोप्राने मोकळेपणाने स्वीकारले. म्हणते, ”माझ्या शरीराचा आकार बदललाय, कारण माझं वय वाढलंय्‌…” (Priyanka Chopra Opens Up On Body Image; Says My Body Has Changed As I Have Become Older)

देशी गर्ल म्हणून ख्याती पावलेली प्रियंका चोप्रा आता विदेशी झाली आहे. अन्‌ इंटरनॅशनल स्टार बनली आहे. निक जोनास या आपल्यापेक्षा कमी वय असलेल्या तरुणाशी लग्न केल्याने लोक तिला काहीबाही बोलले होते. पण तिने लोकांची पर्वा केली नाही.

आत्ताच्या घडीला प्रियंका हॉलिवूडमध्ये स्थिरावली असून तिचे हॉलिवूड चित्रपट येऊ घातले आहेत. २००० साली प्रियंका चोप्राने मिस वर्ल्डचा मान मिळवला होता. तेव्हापासून आपल्या शरीरात झालेले जे बदल तिला आढळून आले, ते तिने मोकळेपणाने स्वीकारले. अन्‌ ते ‘याहू लाईफ’ला मुलाखतीत जाहीर करून टाकले. प्रियंका आता ३८ वर्षांची आहे. ती म्हणते,” १०-२० वर्षांपूर्वी माझं शरीर जसं होतं, तसं ते आता राहिलेलं नाही. कारण वय वाढतंय्‌. अन्‌ वाढत्या वयानुसार सगळ्यांचच शरीर बदलतं.”

प्रियंका पुढे म्हणते की, या गोष्टीचा माझ्यावर परिणाम झालेला नाही, असं खोटं मी बोलणार नाही. पण माझ्या मनाने हे सत्य स्वीकारलं आहे. मी हाच विचार करते आहे की, आता मी अशी दिसते, माझं शरीर असं दिसतंय्‌ तर ठीक आहे ना! कारण मला १०-२० वर्षापूर्वीच्या शरीरासोबत नाही तर याच बदललेल्या शरीरासोबत काम करायचं आहे. अगदी आनंदाने, सकारात्मक विचारांनी, माझी या शरीरासाठी मानसिक तयारी झाली आहे.

आपण जेव्हा घराबाहेर पडतो, तेव्हा आपल्याला आपल्या शरीराबद्दल आत्मविश्वास असायलाच हवा. म्हणूनच मी स्वतःबद्दल चांगला विचार करते. अन्‌ स्वतःच्या जाणीवा चांगल्या ठेवते. कधी कधी असं होतं की, आपला दिवस वाईट जातो. अन्‌ आपल्या शरीराबद्दल आपण नाखुशी व्यक्त करतो. अशा परिस्थितीत ज्या गोष्टींनी मला खुशी मिळेल, त्या गोष्टी मी आवर्जून करते. घरातील लोकांबरोबर चांगला वेळ घालवते. स्वतःचा वेळ चांगला घालवणं हे पण गरजेचं आहे ना!

मला संगीत ऐकावंसं वाटलं तर मी लगेच ऐकते. वर्कआऊट करते. बाथटबमध्ये बसून किंवा मास्क  लावून मी विचारांमध्ये गढून जाते. कारण स्वतःसाठीच नव्हे तर स्वतःशी रमणे गरजेचं असतं. आपल्या प्रथम गरजा आपण ठरवायला हव्या. जेव्हा मी माझ्या खोलीत जाते, तेव्हा खूप बरं वाटतं. आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत, या विचाराने मला खूपच छान वाटतं. माझ्या शरीराशी त्याचं काही देणं घेणं नाही, या सर्व गोष्टींनी आपलं मन हलकं होतं आणि खूप छान वाटतं.