सोना रेस्टॉरंटनंतर प्रियंकाचा नवा ब्रॅंड सोना ह...

सोना रेस्टॉरंटनंतर प्रियंकाचा नवा ब्रॅंड सोना होम (Priyanka Chopra launches her own houseware brand, says- we want to bring community, family, and culture in your home)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नानंतर भलेही भारतात राहत नसली तरी भारतासाठीचे तिचे प्रेम कणभरही कमी झालेले नाही. प्रियंकाने अनेकदा विदेशातही भारतीय संस्कृती, प्रथा-परंपरांचे प्रदर्शन करुन आपण पक्के भारतीय असल्याचे दाखवून दिले आहे. विदेशात राहूनही प्रियंका भारतीय सण किंवा पूजा, पारायण वगैरे व्यवस्थित साजरे करते. आता पुन्हा एकदा या देसी गर्लने अमेरिकेत भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी एक बिझनेस सुरु केला आहे. तिच्या या कार्याचा प्रत्येक भारतीयाला नक्कीच गर्व असेल.

प्रियंकाने गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये  ‘सोना’ नावाचे रेस्टॉरेन्ट सुरु केले. तिथे भारतीय पद्धतीच्या पदार्थांची चव चाखायला मिळते. आता तिने ‘सोना होम’ नावाचा नवा बिझनेस सुरु केला आहे. तिच्या या नव्या बिझनेसविषयी सांगताना प्रियंका खूपच उत्सुक होती.

प्रियंकाने तिच्या सोना होम लॉन्चिंगची बातमी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे. त्यात तिने सांगितले की ‘’सोना होममध्ये होम डेकोरसोबत क्रोकरीसुद्धा समाविष्ट आहे. प्रियंकाने तिचे को-फाउंडर मनिष गोयलसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती घरात वापरायच्या वस्तू दाखवताना दिसते.

व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रियंकाने म्हटले की,  ‘’लॉन्च करण्याचा दिवस आला आहे. सोना होमचा परिचय मी तुम्हाला करुन देणे ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. भारतातून येऊन अमेरिकेत दुसरे घर बनवणे अवघड होते. पण माझ्या प्रवासात मला आणखी एक कुटुंब आणि मित्रपरिवार भेटला. मी जे काही करते त्यात भारताचा नेहमीच समावेश असतो. आणि हे म्हणजे भारतीय विचारांचा विस्तार आहे.’’

प्रियंकाने पुढे लिहिले, “मनीष गोयल आणि त्यांच्या टीमसोबत काम करताना खूप छान वाटले. भारतीय संस्कृती तिथल्या आदरातिथ्यासाठी ओळखली जाते. लोकांना एकत्र आणणे म्हणजे भारतीय संस्कृती आणि माझ्यासाठी सोना होमचा उद्देश सुद्धा हाच आहे. मी आशा करते की तुम्ही तुमच्या घरी तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि संस्कृतीसाठी या प्रेमाचा अनुभव घ्याल. तसेच तिने सोना होममध्ये शॉपिंग करण्यासाठी एक लिंकसुद्धा दिली आहे. पुढे तिने लिहिले की, आपण कधी छानशी पार्टी करत असतो तेव्हा तिथे आपले कुटुंब किंवा मित्रमंडळी असतील तर त्या पार्टीत एक घरपण असावे, सामाजिक बांधिलकी असावी, आणि आपल्याला त्या ठिकाणी आणखी थांबावसं वाटेल अशी जागा असावी. सोना होम तुमच्या या सर्व गरजा पूर्ण करेल.‘’

सोना होम ब्रॅण्डचा फोटो शेअर करत आम्ही सोना होम बनवल्याचा मला गर्व आहे असे तिने म्हटले आहे. यातील सुंदर नक्षी भारताची झलक दाखवते. चाहत्यांना हे सोना होम नक्की आवडेल असा विश्वास प्रियंकाने व्यक्त केला आहे.

प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने नुकतेच तिच्या ‘सिटाडेल या वेब सिरीजचे शूटिंग पूर्ण केले आहे. तसेच ती फराहन अख्तरच्या जी ले जरा मध्ये सुद्धा दिसणार आहे.