वयाच्या ४६ व्या वर्षी प्रिती झिंटा झाली जुळ्यां...

वयाच्या ४६ व्या वर्षी प्रिती झिंटा झाली जुळ्यांची आई (Preity Zinta Became Mother Of Twins At The Age Of 46)

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा आणि तिचा पती जीन गुडइनफ यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक गोड बातमी दिली. त्यांच्या या बातमीने प्रितीचे चाहते प्रचंड आनंदीत झाले आहेत. प्रिती वयाच्या ४६ व्या वर्षी जुळ्या मुलांची आई झाली आहे. तिने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. प्रितीने ही बातमी सोशल मीडियावर शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

प्रितीने तिच्या ट्विटर अकाउंटवर पती जीनसोबतचा एक फोटो शेअर करत आपण जुळ्या मुलांचे पालक झालो आहोत अशी गोड बातमी या पोस्टमध्ये दिली. या जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहेत, ज्यांची नावं प्रितीने जय आणि जिया अशी ठेवली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, वयाच्या ४६ व्या वर्षी प्रिती झिंटा सरोगसीच्या मदतीने आई झाली आहे. प्रितीने मात्र तिच्या पोस्टमध्ये याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

पोस्ट शेअर करताना प्रितीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘सर्वांना नमस्कार, मला तुमच्या सर्वांसोबत एक चांगली बातमी शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आज आम्ही आमच्या कुटुंबात जय झिंटा गुडनफ आणि जिया झिंटा गुडनफ या जुळ्या मुलांचे स्वागत करत आहोत. आमचं अंतःकरण कृतज्ञतेने भरलं आहे.’