धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात फक्त एक...

धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात फक्त एकच माणूस? (Prasad Oak Shared Video Of Man Watching Dhramaveer Movie Alone, Acharya Dharmaraj Guruji Booked Whole Theater)

अभिनेता प्रसाद ओकचा सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवंगत आनंद दिघे (Prasad Oak as Anand Dighe) यांची भूमिका प्रसाद ओक याने साकारली आहे. प्रसादच्या या भूमिकेचं प्रेक्षकांकडून तोंड भरून कौतुक केलं जात आहे. समीक्षकांचीही वाहवा या सिनेमाने मिळवली आहे. इतकंच काय तर इतर हिंदी चित्रपटांनाही या चित्रपटाने मागे टाकलं. आता प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

स्वत: प्रसाद ओकने अशी पोस्ट केली आहे. घडलं असं की ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहण्यासाठी एकच प्रेक्षक उपस्थित होता. तरीही प्रसाद ओकने आनंदाने आणि भावुक होत ही पोस्ट शेअर केली आहे. एका सिनेरसिकाने प्रसाद ओकच्या अभिनयावरील प्रेमाखातर संपूर्ण थिएटर बुक करुन एकट्याने हा सिनेमा पाहिला आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहण्यासाठी आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांनी संपूर्ण सिनेमागृह बुक केले होते. प्रसाद ओकने व्हिडीओ (Prasad Oak Instagram) शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

प्रसादने आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांचे आभार मानले. तसेच धर्मराज गुरुजी यांनी देखील प्रसादचं तोंडभरुन कौतुक केलं. “माझी इच्छा होती की मी एकट्यानेच हा चित्रपट पाहावा. प्रसाद ओक कोणत्याही कार्यक्रमात जातात तिथे ग्लॅमर हे पाहायला मिळतं. प्रसाद म्हणजे अष्टपैलु कलाकार आहेत. तुम्हाला मी धन्यवाद देऊ इच्छितो. तुमचा हा चित्रपट बघत असताना मला माझ्या आजूबाजूला अजिबात आवाज नको होता. मला या चित्रपटात फक्त आणि फक्त तुम्हाला बघायचं होतं.” असं धर्मराज गुरुजी यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

‘प्रत्येक राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात’ हा डायलॉग सर्वाधिक आवडल्याचे यावेळी धर्मराज गुरूजी यांनी सांगितले. १३ मे रोजी धर्मवीर हा सिनेमा प्रदर्शित झाला असून तिसऱ्या आठवड्यानंतरही सिनेमा राज्यभरातील अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल आहे. धर्मवीर सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून निर्मिती मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)