अक्षय-शाहरुख-अजयवर प्रकाश झा यांनी साधला निशाण...

अक्षय-शाहरुख-अजयवर प्रकाश झा यांनी साधला निशाणा म्हणाले, ते गुटख्याच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहेत, ते माझे चित्रपट का करतील (Prakash Jha takes a dig at Akshay, Shah Rukh, Ajay, Says- They are busy minting money from guthka ads, Why will they do my films)

दिग्दर्शक प्रकाश झा चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या बिनधास्त बोलण्यामुळे ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होत असल्याच्या मुद्द्यावर विधान केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आमिर खानचा लाल सिंह चड्ढाहा चित्रपट फ्लॉप झाला तेव्हाही ते म्हणाले होते की, बॉलिवूडमधील लोकांकडे कथा नसेल तर त्यांनी चित्रपट बनवणे बंद करावे. आता पुन्हा एकदा त्यांनी इंडस्ट्रीतील सर्व बड्या स्टार्सवर निशाणा साधला असून सर्व मोठे स्टार्स गुटखा विकण्यात व्यस्त आहेत, असे म्हटले आहे.

अलीकडेच मीडियाशी बोलताना प्रकाश झा यांनी शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना अप्रत्यक्षपणे टोमणा मारला होता. त्यांच्यापैकी कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले होते की, “बॉलिवुडमधील सर्व टॉप स्टार्स गुटखा विकण्यात व्यस्त आहेत, त्यांच्याकडे चित्रपटाच्या आशयाचा विचार करायला वेळ कुठे आहे आणि जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते एखाद्या जुन्या हिट चित्रपटाच्या रिमेकचे हक्क घेऊन चित्रपट बनवतात.

प्रकाश झा पुढे म्हणाले, इंडस्ट्रीतील पाच ते सहा सुपरस्टार माझ्या चित्रपटात कधीच काम करणार नाहीत, कारण ते गुटख्याच्या जाहिरातींमधून पैसे कमवण्यात व्यस्त असतात. गुटख्याच्या जाहिरातीसाठी त्यांना ५० कोटी रुपये मिळतात, मग ते माझ्या चित्रपटात का काम करतील ?

प्रकाश झा यांनी मुलाखतीत बहिष्काराच्या मागणीबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा तुमच्याकडे सांगण्यासाठी चांगली कथा, चांगले साहित्य असेल, तेव्हा कोणत्याही मागणीबद्दल काळजी करण्याची गरज नाही, परंतु सध्या चांगल्या साहित्याची जाण कोणालाच नाही ही मूळ समस्या आहे.

काल म्हणजेच 16 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या मट्टो की सायकलया चित्रपटामुळे प्रकाश सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटात प्रकाश झा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात एका मजुराची कथा दाखवली आहे. ज्याची सायकल 20 वर्षांची आणि मुलगी 19 वर्षांची असते. सायकल म्हातारी होत असताना मुलगी तरुण होत असल्याची चिंता त्या मजूराला  सतावत असते.