रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ध्यानधारणा करा...

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ध्यानधारणा करा व स्वास्थ्य मिळवा (Practice Meditation To Improve Immunity, Stay Healthy & Safe)

ध्यान म्हणजे मेडिटेशन, हे एक वैदिक शास्त्र आहे. ध्यान केल्याने आपण एका उच्च अवस्थेमध्ये पोहचतो. जेथे आपणास जीवनाचं सार कळतं आणि खरा आत्मिक आनंद मिळतो. ज्यामुळे आपण निरोगी बनतो. म्हणून ध्यान म्हणजे काय हे समजून घेणे जरूरी आहे.

ध्यानधारणा म्हणजे काय?

मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेमध्ये मन हे केंद्रस्थानी असतं. मनातील सर्व विचार दूर करून मनाशी एकाग्र होण्याची ही क्रिया आहे. हे सरावाने साध्य होते. चित्त स्थिर ठेवणे आणि मस्तिष्कास परम सुखाचा अनुभव देणे म्हणजे ध्यानधारणा. नियमित ध्यानधारणेमुळे आपण सकारात्मक भावना सवयीच्या करू शकतो आणि विनासायास अधिक प्रेमळ आणि शांत होतो.

ध्यानधारणा आणि आरोग्य

ध्यानावस्थेमध्ये मस्तिष्क अल्फा स्टेटमध्ये जाते, शरीरात आनंदी हार्मोन्स स्रवू लागतात आणि नवीन ऊर्जेच्या संचाराचा अनुभव येतो. ध्यानधारणेमुळे तणावातून मुक्ती आणि अधिक आरामदायक स्थितीचा लाभ मिळतो. आपल्यामधील सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो आणि मन शांत व तणावमूक्त होते. तणाव कमी झाल्यामुळे, त्यापासून उद्‌भवणारे डोकेदुखी, सांधेदुखी, अनिद्रा इत्यादीपासून मुक्ती मिळते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तेव्हा आतापर्यंत ज्यांना असं वाटतं होतं की, ध्यानधारणा ही केवळ मनःशांतीसाठी आहे, त्यांनी हे लक्षात घ्या की मानसिक शांती बरोबरच ध्यानधारणेमुळे शारीरिक व्याधींचेही निवारण होते. एवढेच नाही तर, हृदयविकार, मधुमेह, स्थूलता, अगदी कॅन्सरसारख्या आजारासाठीही ध्यानधारणा उपयुक्त ठरते. ध्यानधारणा शरीरातील आरामाच्या प्रतिसादाला कार्यान्वित करते, ज्यामुळे व्यक्ती गंभीर आजार तसेच दुखापत व कोणत्याही दुखण्यातून बरी होते.

ध्यानाच्या पूर्णावस्थेमध्ये आपण कोणत्या शक्ती जागृत करू शकतो आणि काय साध्य करू शकतो?

आपल्या मनामध्ये अनेक शक्ती असतात परंतु आपणास त्याची कल्पना नसते किंवा मनाशी एकरूप होऊन, त्या शक्ती जागृत करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. हे जाणून घेणे व त्यासाठी मनाशी एकरुप होणे म्हणजे ध्यान आहे.

–   ध्यानामुळे शरीरातील चक्रं जागृत होतात आणि आपल्याला ऊर्जा प्रदान करतात.

–  आपल्या शरीराचे प्रत्येक अंग हे कोणत्या ना कोणत्या चक्राशी संबंधित असतं. यापैकी कोणत्याही अंगास व्याधी जडली तर त्याच्याशी संबंधित चक्र कार्यान्वित करून ते अंग संतुलित करता येते आणि त्यासंबंधीत व्याधी दूर करता येते.

– ध्यानावस्थेमध्ये शरीरात आनंदी हार्मोन्स स्रवू लागतात.

– ध्यानधारणेमुळे अनेक शारीरिक समस्यांचं निवारण होतं.

– रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. यामुळे आपली श्वसनक्रिया सुधारते.

-उच्च रक्तदाब, अनिद्रा, मांसपेशींचे दुखणे, हृदयविकार, मधुमेह, स्थूलता तसेच कॅन्सरसारख्या असाध्य आजारापासूनही मुक्ती मिळवता येते.

-ध्यानधारणेमुळे मेंदुपर्यंत रक्तसंचार वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

अनेक संशोधनांती असं सिद्ध झालं आहे की, ध्यानधारणेमुळे तणावाशी संबंधित हार्मोन कार्टिसॉलचे प्रमाण कमी होते आणि मज्जासंस्थेचे नवे मार्ग विकसित होतात. मेंदूमधील रक्तपुरवठा वाढून हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. हृदयाचे ठोके संतूलित होतात, स्टॅमिना वाढतो, शरीर ऑक्सिजनचा योग्य पद्धतीने वापर करते, पेशींची निर्मिती होते.