बॉलिवूडमधील कास्टिंग काऊच बाबत प्राची देसाईचा ग...

बॉलिवूडमधील कास्टिंग काऊच बाबत प्राची देसाईचा गौप्यस्फोट (Prachi Desai Opens Up On Casting Couch In Bollywood)

बॉलिवूडमध्ये अधूनमधून काही विवादास्पद मुद्दे समोर येत राहतात. कधी घराणेशाही, वशिलेबाजी, कंपूशाही तर कधी कास्टिंग काऊच. अर्थात्‌ अभिनेत्रींना, इच्छुक तरुणींना शय्यासोबत करण्याची मागणी केली जाते. हा मुद्दा जेवढा विवादास्पद आहे, तेव्हढाच जुना आहे.

या वादग्रस्त मुद्द्यावर काही कलावंत दबक्या आवाजात तर काही जण खुलेपणाने बोलतात. आता अभिनेत्री प्राची देसाई या विषयावर व्यक्त झाली आहे. ‘कसम से’ या टी. व्ही. कार्यक्रमातून प्राची इतकी लोकप्रिय झाली की, तिला बॉलिवूडची मागणी येऊ लागली.

‘कसम से’ या कार्यक्रमातून प्राचीने २००६ साली टेलिव्हिजन सृष्टीत पदार्पण केलं आणि २००८ साली ‘रॉक ऑन’ या चित्रपटात ती दिसली. पुढे ती वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, अजहर, बोल बच्चन आदी चित्रपटांमध्ये पण चमकली. हल्लीच एका वेब पोर्टलवर तिने उघड केलं की, बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच, नेपोटिजम्‌ आदी प्रकार घडतात. मला स्वतःला हा वाईट अनुभव आला आहे. एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आली होती. पण त्याच्या दिग्दर्शकाने मला त्यासाठी तडजोड (शारीरीक) करण्याची अट घातली. मी त्याला साफ नकार दिला. तरी पण त्याने माझा पिच्छा सोडला नाही. अन्‌ चित्रपटात काम करण्याची गळ घातली. तर मी तो चित्रपटच सोडला.

ओटीटी प्लॅटफॉर्म आल्याने सगळ्यांना संधी मिळते आहे, असेही प्राचीने सांगितले. ती स्वतःच या मंचावर दिसणार आहे.