लोकप्रिय टी.व्ही. अभिनेत्री नुपूर अलंकारचा वयाच...

लोकप्रिय टी.व्ही. अभिनेत्री नुपूर अलंकारचा वयाच्या 49 व्या वर्षी संन्यास (Popular TV Actress Nupur Alankar Quits Glamour Industry, Takes Sanyaas)

टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री नुपुर अलंकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. 27 वर्षांची यशस्वी कारकीर्द सोडून ती हिमालयात जात आहे. नुपुरने संन्यास घेतला आहे. आता ती मुंबई, आपले करीअर आणि कुटुंबाला सोडून हिमालयात यात्रेसाठी निघाली आहे. नुपूरने टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत तिच्या निर्णयाबद्दल सांगितले.

नुपुरने पूर्णपणे भगवे कपडे परिधान केले आहेत. 49 वर्षीय नुपुरने  दीया और बाती हम, अगले जनम मोहे बिटियाही कीजो, स्वारागिनी, घर की लक्ष्मी बेटीयां यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात तिची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली. तिची आई खूपच आजारी असल्यामुळे ती आर्थिक मदतीची याचना करत होती. आई आजारी असल्यामुळे ती कोणतेच काम सुद्धा करु शकत नव्हती. नंतर अक्षय कुमारसोबतच आणखी काही लोकांनी तिला मदत केली.

नुपुर म्हणते की, माझ्या आयुष्यात आता अभिनयाला स्थान नाही. डिसेंबर 2020 मध्ये माझ्या आईच्या मृत्यूनंतर, मला जाणवले की आता मला गमावण्यासारखे काहीही नाही किंवा काहीही गमावण्याची भीती नाही. मी स्वतःला सर्व बंधन आणि कर्तव्यांपासून मुक्त केले आहे. पण जर लोकांना वाटत असेल की मी हा निर्णय निराशेने किंवा हताश होऊन घेतला आहे, तर ते चुकीचे आहे. मी बराच काळ अध्यात्माशी जोडली गेली आहे.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नुपुरने तिचा निर्णय तपशीलवार सांगितला – मी फेब्रुवारीमध्ये संन्यास घेतला होता. मी तीर्थयात्रेत व्यस्त आहे. मी गरजूंना मदत करण्याचे ठरवले आहे. माझा नेहमीच अध्यात्माकडे कल राहिला आहे आणि ते मी पाळतही आले आहे. त्यामुळे आता मी स्वतःला अध्यात्मामध्ये पूर्णपणे समर्पित केले आहे.गुरू शंभू शरण झा यांच्यामुळे मी धन्य झाले. त्यांनीच माझ्या आयुष्याला दिशा दाखवली. खरेतर माझ्या संन्यासाला उशीरच झाला कारण माझे भाऊजी (कौशल अग्रवाल) हे जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवला होता तेव्हा ते तिथेच अडकले होते.

नुपुरने आपले पती अलंकार श्रीवास्तव आणि सासरच्या लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले की, माझे पती आणि मी कायदेशीररित्या वेगळे झालो नसलो तरीही वेगळे राहू. मी त्यांना माझ्या निर्णयाची आधीच कल्पना दिली होती. त्यांना मी माझी इच्छा आधीच सांगितली होती. त्यांनीही मला मुक्त केले आहे. माझ्या या निर्णयाला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे.

नुपुरने जिथे समिती सदस्य म्हणून काम केले, आरोग्य कार्यशाळा आयोजित केल्या त्या सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचेही आभार मानले. नुपुर म्हणाली की, मी खूप भाग्यवान आहे म्हणून मला गुरु शंभू शरण झासारखे गुरु मिळाले. त्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले.

नुपुरने तिचा मुंबईतील फ्लॅट भाड्याने दिला आहे. या भाड्यातून मिळणाऱ्या पैशाने ती आपला प्रवास आणि मूलभूत खर्च भागवणार आहे. नुपुर आता खूप शाश्वत जीवन जगते. ती एकदम साधे कपडे परिधान करते. दिवसातून एकदाच जेवते, जमिनीवर झोपते. नुपुरच्या मते ती एका चांगल्या कामाकडे वाटचाल करत आहे ज्यामुळे तिची आध्यात्मिक वाढही होईल. नुपुरच्या बहिणीने नुपुर खूप आध्यात्मिक असून अनेक वर्षांपासून योग करत असल्याचे सांगितले.

नुपुर म्हणते, “हिमालयात राहिल्याने माझा आध्यात्मिक प्रवास वाढेल आणि तो गतिमान होईल.” हे खरोखर एक मोठे पाऊल आहे. आता माझ्या या भगव्या कपड्यांबद्दल किंवा दिसण्याबद्दल लोक काय म्हणतात किंवा काय विचार करतात याची मला पर्वा नाही. जेव्हा मी शोबिझमध्ये होते तेव्हा मला यश-अपयशाची चिंता असायची, पण आता मी या गोष्टींपासून मुक्त आहे, आता आयुष्यात आणि माझ्या मनात शांतता आहे.