स्मार्टफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट (Pondi...

स्मार्टफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट (Pondicherry : The First Marathi Film Shot On Smart Phone)

काही दिवसांपूर्वीच ‘पाँडीचेरी’ या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील हा पहिला मराठी चित्रपट अवघ्या एका महिन्यात बनविण्यात आला आहे. त्यामुळे ‘पाँडीचेरी’ चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढत आहे. ‘पाँडीचेरी’चे निसर्गसौंदर्य, अथांग समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फ़्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनोखे नातेसंबंध या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. ‘गुलाबजाम’ सारख्या दर्जेदार चित्रपटाची मेजवानी दिल्यानंतर आता सचिन कुंडलकर दर्शकांना ‘पाँडीचेरी’ची सैर घडवणार आहेत.

चित्रपटाच्या नावावरूनच लक्षात येतं की, निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेल्या ‘पाँडीचेरी’ शहरात घडणारी ही कथा आहे. सई, वैभव आणि अमृता यांच्या आगळ्यावेगळ्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असून ट्रेलर पाहता हा चित्रपट लव्ह ट्रॅन्गल असल्याचे जरी दिसत असले तरी नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या ‘पाँडीचेरी’च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास दिसत आहे. हा प्रवास त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर घेऊन जातो आणि त्यांच्या नात्यातील हा गुंता सुटतो का, हे ‘पाँडीचेरी’ पाहिल्यावरच कळेल.

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना सई ताम्हणकर म्हणते, ” यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. या चित्रपटात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.”

तर वैभव तत्ववादी आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो की, “चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा अनेक छटा माझ्या व्यक्तिरेखेला आहेत. पाँडीचेरी शहरावर आधारित ही कथा आहे. आकर्षक फ्रेम्स, जबरदस्त दिग्दर्शन आणि संपूर्ण चित्रपटाचे चित्रण हे प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आहे, जे त्यांना नक्कीच आवडेल.”

‘पाँडीचेरी’ चित्रपटामध्ये अमृता खानविलकरच्या भूमिकेबद्दल सांगायचे तर तिची व्यक्तिरेखा अत्यंत गुंतागुंतीची दाखविण्यात आली आहे आणि भूतकाळात झालेल्या आघातांवर ती मात करण्याचा प्रयत्न करत आहे. कलाकारांसह केवळ पंधरा लोकांसोबत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा अनुभवही खूप आगळावेगळा होता असे अमृताने म्हटले आहे.

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ‘पाँडीचेरी’बद्दल म्हणतात, ”हा चित्रपट नात्याभोवती फिरणारा असला तरी नात्याची परिभाषा बदलणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण स्मार्टफोनवर झाले असूनही पडद्यावर बघताना प्रेक्षकांना याची कुठेही जाणीव होणार नाही, इतक्या सराईतपणे तो चित्रित करण्यात आला आहे. मोठ्या कालावधीनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा प्लॅनेट मराठीचा हा पहिला चित्रपट असून सिनेरसिकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल आणि याचा अनुभव त्यांनी चित्रपटगृहातच घ्यावा.”

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘पाँडीचेरी’ या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. तर नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य ‘पाँडीचेरी’ आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत.