आनंद देणारे ऊर्जास्रोत (Pleasure Deriving Energ...

आनंद देणारे ऊर्जास्रोत (Pleasure Deriving Energy Sources)

फेंगशुई शास्त्रानुसार आपल्या सभोवतालच्या परिसरातील काही ऊर्जास्रोतांचा योग्य वापर करून आपण आपल्या जीवनात आनंद आणू शकतो.
फेंगशुई हे चायनीज शास्त्र आहे. फेंगशुईचा वापर घरात केल्याने जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडायला लागल्या असं आपण नेहमीच ऐकतो. चीनच्या संस्कृतीप्रमाणे सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जेसाठी वारा आणि पाणी हे दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत. या घटकांबद्दल योग्य ज्ञान घेऊन आणि त्यांचा वापर करून आपण सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेऊ शकतो. फेंगशुईप्रमाणे ही ऊर्जेची माध्यमं कोणती आहेत ते आपण या लेखात पाहुया.

सभोवतालचा परिसर
तुम्ही राहत असलेल्या इमारतीच्या जवळपास हॉस्पिटल, तुरुंग, पोलीस ठाणे, रिकामा प्लॉट किंवा स्मशान असेल तर त्याचा यीन प्रभाव तुमच्या वास्तूवर पडेल. तसेच इलेक्ट्रिक तारा, कारखाने यांचा यांग प्रभाव तुमच्या वास्तूवर पडेल. घराच्या जवळपास शाळा, मंदिर, चर्च, मस्जिद असेल तर त्याचा कधी यीन तर कधी यांग असा असंतुलित प्रभाव तुमच्या वास्तूवर पडेल.

प्रकाश
वास्तूमध्ये शुभ ऊर्जा निर्माण होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता आहे. विजेचे दिवे लावून केलेल्या प्रकाशापेक्षाही घरात नैसर्गिक उजेड असणे अधिक गरजेचे आहे. अति प्रखर प्रकाश मात्र वास्तूस हानिकारक आहे. मंद, सुखद व आल्हाददायी उजेड वास्तूमध्ये असावा. मेणबत्तीचा प्रकाशही घरामध्ये शुभ ऊर्जा निर्माण करणारा असतो.

झाडे
सभोवतालची झाडे ही सजीव असतात व ती वास्तूमध्ये शुभ ऊर्जा निर्माण करतात. झोपण्याच्या खोलीत मात्र रात्री झाडे ठेवू नयेत. कारण ती आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन रात्री शोषून घेतात. वास्तूमध्ये बाहेर आलेल्या कोपर्‍यांच्या ठिकाणी झाडे ठेवल्याने अशुभ ऊर्जेला प्रतिबंध घालता येतो. निवडुंग, काटेरी झाडे, बोन्साय इत्यादी रोपे घरात ठेवू नयेत.

आरसे
वास्तूत भरपूर नैसर्गिक प्रकाश हवा असल्यास आरशाचा वापर करून बाहेरील ऊर्जा वास्तूमध्ये आणता येते. आरसे लावून नदी, पाणी वगैरे शुभ ऊर्जेचे परिवर्तन वास्तूत आणले जाते. घरातील कापल्या गेलेल्या कोपर्‍यांसाठी आरशाचा वापर करता येतो. यासाठी वापरण्यात येणारे आरसे फुटके, धुरकट किंवा वेड्यावाकड्या आकाराचे असू नयेत. वास्तू गुणोत्कर्षासाठी आरशाचा वापर करताना आरशामध्ये पडणार्‍या प्रतिबिंबाचाही विचार करावा. नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखण्यासाठी मुख्य दरवाजाच्या वर बाहेरील बाजूला आरसा लावला जातो.

रंग
वास्तूमध्ये रंगसंगतीला फार महत्त्व आहे. लाल रंग सक्रिय असून कार्यक्षमता वाढविणारा व प्रगती दर्शविणारा आहे. हिरवा रंग आरोग्यदायी, उत्तम स्वास्थ्य व उत्साह वाढविणारा आहे. पिवळा रंग पचनशक्ती व बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. सोनेरी रंग वैभवाचे प्रतीक आहे तर निळा रंग धन-संपत्ती, शांतता व मानसिक स्वास्थ्य दर्शवणारा आहे.

वारा
सर्व घरात वारा (ऊर्जा) योग्य प्रमाणात फिरावा यासाठी घंटानाद, पडदे इत्यादींचा वापर करून शुभ नियंत्रण राखता येते. घरातील ऊर्जा सकारात्मक असेल तरच सौभाग्य येऊ शकते म्हणून घरात प्रवेशद्वारातून व खिडकीतून येणार्‍या हवेसंबंधी काळजीपूर्वक विचार करावा. हवा आपल्या अवतीभवती फिरत राहावी, पटकन निघून जाऊ नये. घरातील प्रत्येक खोली वापरात असावी व ती बंद न ठेवता तेथे हवा खेळती राहील हे पाहावे.

स्वतःचं घर होण्यासाठी काय करावं? (How to Make Your Own Home)