सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून महत्वाच्या पात्र...

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून महत्वाच्या पात्राची एक्झिट, ‘अलविदा ना पब्लिक’ म्हणत घेतला प्रेक्षकांचा निरोप (Pivotal Character Of Marathi Serial “Sundara Manamdhye Bharli ” Takes An Exit From The Program)

सुंदरा मनामध्ये भरली ही वेगळ्या धाटणीची मालिका गेली अडीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेचा चाहता वर्ग बराच मोठा आणि त्याचप्रमाणे या मालिकेतील कलाकारसुद्धा प्रेक्षकांना नेहमीच आपलेसे वाटतात. विशेष म्हणजे या मालिकेतील खलनायकाची देखील चाहत्यांची वेगळीच क्रेझ आहे.

सध्या या मालिकेत रंजक वळण आलेले पाहायला मिळते. एक आगळावेगळा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळत असून सध्याचे मालिकेतील सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. देवाच्या आईचे किडनॅपिंग, तेथून त्यांची सुटका, देवा आणि लतिकाचा मास्टर प्लॅन आणि मग प्रेक्षकांना ज्याची प्रतिक्षा होती तो क्षण… ते म्हणजे दोलतच्या हातत बेड्या.

देवाच्या हातून लतिकाचा खून होणार असल्याचा प्रोमो जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. पण नंतर हा देवा आणि लतिकाचाच प्लॅन असल्याचे समोर आल्यावर तयार केलेल्या सीनवर व लेखकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पण आता सुंदरा मनामध्ये भरली मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मालिकेतील महत्वाच्या पात्राने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. ते पात्र म्हणजे दौलत. दौलत हे या मालिकेचे खलपात्र असले तरी त्याची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ होती. या पात्राचे वागणे-बोलणे तसेच त्याची हेअर स्टाइल यांसारख्या अगदी बारीकसारिक गोष्टी चाहते फॉलो करायचे. पण आता यापुढे हे पात्र पाहायला मिळणार नाही. दौलतच्या विरोधी भूमिकेने अभिनेता ऋषीकेश शेलार प्रचंड लोकप्रिय झाला. नायक नायिकेला जेवढी प्रसिद्धी मालिकेने मिळवून दिली, तेवढीच प्रसिद्धी ऋषिकेशला सुद्धा मिळाली. मात्र आता या पात्राची निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपली असल्याने ऋषिकेशने यावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

ऋषिकेश म्हणतो की, अलविदा ना पब्लिक! आज सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील माझा ‘दौलत’ या पात्राचा प्रवास संपतोय.गेलं अडीच वर्ष हे पात्र साकारताना मजा आली. तुम्हा रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. दौलत हे पात्र रंगवण्यात लेखिका, दिग्दर्शक, सहकलाकार आणि टेक्निकल टीम ह्या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. स्टोबेरी पिक्चर्स यांनी मालिकेची निर्मिती केल्याबद्दल धन्यवाद. कलर्स मराठीचे विशेष आभार, कारण एखादी भूमिका आपण बरी करू शकू असा विश्वास नट म्हणून आपल्याला स्वतःविषयी अनेकदा वाटतच असतो. पण आपल्यावर विश्वास ठेवून योग्य वेळी संधी देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि माझ्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ही संधी कलर्स मराठीनी मला दिली. रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. कारण जेवढं प्रेम तुम्ही दौलतला दिलंत, तेवढं प्रेम त्याच्या आयुष्यात आलेल्या एकाही मुलीनं किंवा त्याच्या स्वतःच्या आईनं सुद्धा त्याला कधी दिलं नाही.