पितृपक्ष – श्राद्धाचे महत्व आणि केव्हा कर...

पितृपक्ष – श्राद्धाचे महत्व आणि केव्हा करावे… (Pitru Paksha 2022- Important Things To Do During Shradh)

भाद्रपदाची पौर्णिमा आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा याला पितृपक्ष म्हणतात.  हिंदू धर्मात श्राद्ध करण्याला खूप महत्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते. पितृपक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध आणि आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान केले जाते. यावर्षी पितृपक्ष कालपासून सुरू झाला असून तो २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल. पितृपक्षाचे महत्त्व हिंदू पुराणांमध्ये सविस्तर सांगितले आहे. जाणून घेऊया पितृपक्षातील श्राद्धाच्या तारखा आणि त्याचे महत्त्व.

पितृपक्षातील श्राद्धाच्या तारखा

१० सप्टेंबर २०२२ – प्रतिपदा श्राद्ध/पौर्णिमा श्राद्ध

११ सप्टेंबर २०२२ – द्वितीया श्राद्ध

१२ सप्टेंबर २०२२ – तृतीया श्राद्ध

१३ सप्टेंबर २०२२ – चतुर्थी श्राद्ध

१४ सप्टेंबर २०२२ – पंचमी श्राद्ध

१५ सप्टेंबर २०२२ – षष्ठी श्राद्ध

१६ सप्टेंबर २०२२ – सप्तमी श्राद्ध

१८ सप्टेंबर २०२२ – अष्टमी श्राद्ध

१९ सप्टेंबर २०२२ – नवमी श्राद्ध

२० सप्टेंबर २०२२ – दशमी श्राद्ध

२१ सप्टेंबर २०२२ – एकादशी श्राद्ध

२२ सप्टेंबर २०२२ – द्वादशी / संन्याशांचे श्राद्ध

२३ सप्टेंबर २०२२ – त्रयोदशी श्राद्ध

२४ सप्टेंबर २०२२ – चतुर्दशी श्राद्ध

२५ सप्टेंबर २०२२ – अमावस्या श्राद्ध, सर्व पितृ अमावस्या श्राद्ध

श्राद्धाचे महत्त्व

ब्रह्मपुराणानुसार देवतांची पूजा करण्यापूर्वी पितरांची पूजा करावी कारण यामुळे देवता प्रसन्न होतात असे मानले जाते. या कारणास्तव भारतीय समाजात ज्येष्ठांचा आदर आणि पूजा केली जाते. ज्या तिथीला घरच्या व्यक्तीचे निधन झाले, पितृपक्षातील त्या तिथीला त्यांच्या नावाने गाईला पान लावण्यात येते. ज्यांची तिथी माहिती नसते त्यांचे पान अश्विन अमावस्येला म्हणजेच सर्व पितृ अमावास्येला (Sarv Pitru Amavasya 2022) लावण्यात येते. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान देतात तसेच भोजन आणि दक्षिणा अर्पण करून पूर्वजांचे स्मरण केले जाते. मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना तर्पण किंवा पिंडदान दिले नाही तर पितरांच्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही असे मानले जाते. तसेच पितरांचे पिंडदान केले नाही तर त्यांचा आत्मा मृत्यूलोकात भटकत राहतो अशी देखील मान्यता आहे.

श्राद्धाशी संबंधित आख्यायिका

जेव्हा महाभारत युद्धात महान दाता कर्णाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला, जिथे त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली. तथापि, कर्णाला खाण्यासाठी खऱ्या अन्नाची गरज होती आणि त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्राला अन्न म्हणून सोने देण्याचे कारण विचारले. इंद्राने कर्णाला सांगितले की, त्याने आयुष्यभर सोने दान केले, पण श्राद्धात आपल्या पितरांना कधीही अन्न दिले नाही. कर्ण म्हणाला की, तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्यांच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही. याची सुधारणा करण्यासाठी, कर्णाला १५ दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून तो श्राद्ध करू शकेल आणि त्याच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल. तेव्हापासून हा काळ पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो, अशी आख्यायिका आहे.