पती-पत्नीचे शरीरसंबंध अधिकार की बलात्कार? (Phys...

पती-पत्नीचे शरीरसंबंध अधिकार की बलात्कार? (Physical Contacts Of Husband-Wife: How To Describe? A Right Or Rape?)

 • सुधीर सेवेकर
  पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे हा बलात्कार (रेप) ठरू शकत नाही, असे भारतीय न्यायपालिकेस आजही वाटते. अशा वैवाहिक बलात्काराची सडेतोड चिकित्सा.
  पतीने पत्नीशी केव्हाही, कधीही, कितीही वेळा शरीरसंबंध ठेवणे, हा पतीचा अधिकार असू शकतो का? पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने तिच्यावर बळजबरी करणे हा बलात्कार ठरू शकतो का? यावर अनेकदा चर्चा होत असते. असंख्य विवाहित स्त्रियांना त्यांच्या मर्जीविरुद्ध शरीरसंबंध स्विकारावे लागतात. कारण तो नवर्‍याचा अधिकारच आहे, असेच शेकडो वर्षांपासून जगातील अनेक देशातून मानले जाते. भारतातही मानले जाते. त्यामुळे असंख्य पीडित विवाहित अशा प्रकारचा अत्याचार सोसत असतात. त्याविषयी बोलत नाहीत. तक्रार करीत नाहीत. नवर्‍याला विरोध केला तर तो शारीरिक बळाचा वापर करतो. स्त्रीला मारहाण करतो आणि त्याला हवे ते सुख बळजबरीने स्त्रीकडून वसुल करतो. पत्नी बिचारी हतबल ठरते. घरातल्या अन्य ज्येष्ठ सदस्यांनाही ती बिचारी तिची ही व्यथा सांगू शकत नाही. सांगितली तर तिचे ऐकले जात नाहीच, उलट तिलाच शरीरसंबंधात गैर काही नाही. आपल्या पतीला सुख देणे हे प्रत्येक पत्नीचे कर्तव्यच आहे, असे उपदेशामृत तिला पाजले जाते. परिणामी परस्परांच्या राजीखुषीतून, प्रेमातून घडणार्‍या शरीरसंबंधाचा आनंद वा सुख स्त्रीच्या वाट्याला क्वचितच येते. तिच्या या कुचंबणेतून भारतीय कायदाही तिची सुटका करू शकत नाही. कारण भारतीय न्यायपालिकेचा कारभार भारतीय दंड विधानानुसार (इंडियन पीनल कोड) चालतो. या इंडियन पीनल कोडमध्ये पतीने आपल्या पत्नीशी केलेला शरीरसंबंध मग तो तिच्या मर्जीविरुद्ध का असेना, तो गुन्हा ठरू शकत नाही. अशी ही सगळी कोंडी आहे.
 • बदल झाला पाहिजे
  जगभरातील अनेक देशातून ही कोंडी आढळते. त्यात भारत देशही आहे. वास्तविक त्यात बदल झालाच पाहिजे. स्त्रीच्या मर्जीविरुद्ध तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडणे याला ‘वैवाहिक बलात्कार’ मानले पाहिजे. हा विचार आता अनेक देशातून रुजतो आहे. स्त्री संघटनाही त्याबाबत आवाज उठवू लागलेल्या आहेत. अलिकडेच हिंदीमध्ये ‘पिंक’ नामक एक चित्रपट आला होता. त्यातही हाच मुद्दा होता. स्त्रीच्या नकाराला न्यायव्यवस्थेने महत्त्व दिले पाहिजे. ती जर ‘नाही, नको, ना’ म्हणत असेल आणि तरीही तिच्यावर बळजबरी केली जात असेल, तर त्या पुरुषाविरुद्ध – मग तो तिचा पती का असेना, बलात्काराचा गुन्हा नोंदविला पाहिजे आणि त्यासाठीची शिक्षाही दिली गेली पाहिजे, असे ‘पिंक’ मध्ये जोरदारपणे मांडलेले होते.
  परंतु अलिकडेच छत्तीसगड उच्चन्यायालयाने पतीच्या बळजबरीस ‘वैवाहिक बलात्कार’ मानता येणार नाही, तो गुन्हा होऊ शकत नाही असा निकाल दिलेला आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे.
 • जुनी दंडविधान संहिता
  भारतीय न्यायव्यवस्था भारतीय दंडविधान संहितेनुसार इंडियन पीनल कोडनुसार काम करते. त्यानुसार फैसले सुनावते. ही दंडविधान संहिता ब्रिटिश राजवटीत म्हणजे दीड पावणे दोन वर्षांपूर्वी तयार केलेली आहे. त्यातील अनेक मुद्दे गैरलागू आहेत. कालबाह्य झालेले आहेत. जुनाट आणि अन्यायी स्वरुपाचे आहेत. तीत मुळात बदल होणे आवश्यक आहे. न्यायमूर्तीस म्हणजे जजला जरी वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला पाहिजे असे व्यक्तिशः वाटले, तरी असे मॅटर त्याच्यासमोर आले तर, तो त्याच्या विवेकाला वाटते, त्याप्रमाणे न्याय देऊ शकत नाही. त्याला त्यांच्या निकालासाठी भारतीय दंडविधान संहितेचाच आधार घ्यावा लागतो.
  भारतीय दंडविधान संहितेत काही बदल, सुधारणा झाल्याही आहेत. एकूण समाजमनानेही स्त्रीपुरुष समानता, स्त्रियांना समान अधिकार इत्यादी गोष्टी मान्य केलेल्या आहेत. करीत आहेत. पण तरी अजुनही भारतामध्ये, भारतीय कायदेकानून यामध्ये पुरुषप्रधान मानसिकता घट्ट बसलेली आहे, याची अनेक उदाहरणे वेळोवेळी समोर येत असतातच.
 • वैवाहिक बलात्कार हा गुन्हा
  वास्तविक वैवाहिक बलात्कार या संदर्भात सखोल विचार करण्यासाठी इ.स. 2013 मध्ये न्या. जे.एस.वर्मा यांची समिती नेमण्यात आली होती, या समितीनेही पत्नीच्या मर्जीविरुद्ध पतीने बळजबरीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले तर त्याला वैवाहिक बलात्कार मानून गुन्हा दाखल केला पाहिजे असा अभिप्राय व्यक्त केला होता आणि भारतीय दंडविधान संहितेतील याबाबतच्या कलम 375 मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत असे मत व्यक्त केले होते. पण अजुनही संबंधितांकडून, न्याय मंत्रालयाकडून यासंदर्भात काही कृती केली गेलेली नाही. म्हणूनच छत्तीसगड उच्चन्यायालयाने वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरत नाही असे म्हटले.
  भारतीय मू्ल्यावस्था, न्यायव्यवस्था, दंडसंहिता यामध्ये अनेक अन्यही पुष्कळ विसंगती, अपुरेपणा, एकांगीपणा आलेला आहे. त्याचेही निराकरण व्हायला हवे आणि कोणाही स्त्रीच्या मग ती अविवाहित असो वा विवाहित, तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवणार्‍या पुरुषावर बलात्काराचा गुन्हा नोंदविला पाहिजे असे प्रत्येक सुबुद्ध नागरिकास वाटते.