करोनाच्या येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत लहान मुला...

करोनाच्या येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका : वैद्यकीय तज्ज्ञांचे भय (Pediatric Cases May Increase In The Third Wave : Doctor’s Predict)

सध्या करोना संसर्गाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे. या लाटेत गटांगळ्या खाणाऱ्या रुग्णांची योग्य उपचार व प्राणवायू अभावी कुचंबणा होत आहे. तशातच तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वैद्यकीय उपचार तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अन्‌ या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका निर्माण होणार असल्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सुप्रसिद्ध वैद्यकीय शिक्षण संचालक आणि राज्याच्या कृती दलाचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी माहिती दिली आहे की, पहिल्या लाटेत लहान मुलांना कोविड बाधा होण्याचे प्रमाण फक्त १ टक्का होतं. सध्याच्या दुसऱ्या लाटेत ते साडेतीन ते ४ टक्के असून, तिसऱ्या लाटेत हेच प्रमाण १० टक्के झाल्यास नवल वाटायला नको. सुरूवातीला कोविड बाधा ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तीला होत होती. आता २० वर्षांहून अधिक वयोगटातील तरुणांना हा रोग पछाडतो आहे. यापुढे मात्र याहून लहान वयाच्या मुलांना तो पछाडण्याची दाट शक्यता आहे.

या साथीला आळा घालण्यासाठी गावोगावी असलेल्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये त्याचे निदान करून उपचार व्हायला हवे. त्यासाठी ती केंद्रे प्राणवायू संपन्न केली पाहिजेत. म्हणजे अति दक्षता विभागावर ताण पडणार नाही व मृत्यूदर कमी राहील, असेही डॉ. लहाने यांनी सुतोवाच केले आहे.

लसीकरण केंद्रावरील बेसुमार गर्दी आटोक्यात आणण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे केवळ अपॉइन्टमेन्ट घेऊन ती देण्याची तजवीज केली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.