होळी – अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रण...

होळी – अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम (Pay Gratitude To Fire On Holi Night)

होळी पेटत असताना त्यात सर्वांच्या मनातील वाईटसाईट प्रवृत्ती जाळून टाकत मन स्वच्छ करणं, असो नाहीतर वय-जात-धर्म-लिंग-आर्थिक स्तर वगैरे सगळे भेद विसरून मुक्त मनानं एकमेकांना रंगवणं असो, निखळ आनंद देण्याची क्षमता असलेल्या या प्रथा साधेपणानं जतन करण्याचा संकल्प या होळीच्या निमित्तानं करू.

होळी म्हणजे, सर्वांना गारठवून टाकणार्‍या थंडीला निरोप. होळी म्हणजे, थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणार्‍या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे, ऋतुराज वसंताचे स्वागत. या उत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे होळी पेटवणं. तो पौर्णिमेच्या दिवशी होतो. संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रांताप्रमाणे कुठे 15 दिवस आधी, कुठे आठवडाभर आधी, तर कुठे होळीच्या दिवसापासून पुढे पाच दिवस असा हा उत्सव साजरा होत असतो किंवा या उत्सवाची तयारी सुरू असते. या रंगोत्सवाचा उत्साह लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकाच्या चेहर्‍यांवरून ओसंडून वाहत असतो. रंगांची उधळण, पुरणाची पोळी, मिठाई, थंडाई यांसारखं गोडान्न, नाचगाणं आणि भांगेची नशा… असा सर्वार्थानं आनंदोत्सव !

विविध प्रांतातील नावं
या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात यास शिमगा म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणार्‍या या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसर्‍या दिवशी सुरू होणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतागमनोत्सव किंवा वसंतोत्सव असंही म्हणण्यात येतं. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

कोकणातील शिमगा
कोकणातून मुंबईत कामानिमित्त आलेला चाकरमनी गणपती आणि शिमग्यास आपल्या गावी हमखास जातो. शिमग्याचा हा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. या वेळी शेतीची कामं संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते आणि आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे 6-7 जूनपर्यंत (रोहिणी नक्षत्र) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात विशेष आनंदात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो. फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते.

कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळीभोवती फेर धरून लोकगीतं म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला-बाहुलीचं लग्न लावण्याचीही प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होतं. वरात, मंगलाष्टकं, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.

प्रांतीय होळी
होळी हा संपूर्ण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहानं साजरा होणारा सण आहे. काही अंशी महाराष्ट्र आणि इतर दक्षिणेकडील प्रदेशापेक्षा गुजरात आणि पंजाबात हा सण अधिक लोकप्रिय आहे.
उत्तर भारतातील व्रज भागात होळीचं महत्त्व विशेष आहे. येथील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत. उत्तर भारतातील खेडेगावात लाकडं रचून त्याची होळी पेटवली जाते आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. व्रजच्या होळी परंपरेत होलिका दहनापूर्वी लठ्ठमार होळी असते. मथुरा, वृंदावन, बरसाना या प्रदेशात ही लठ्ठमार होळी धूमधडाक्यात साजरी होते. या प्रसंगी स्त्रिया हाती लाठ्या घेऊन पुरुषांस मारतात तर पुरुष कापडाच्या ढालींनी आपला बचाव करतात. वृंदावन आणि मथुरा येथे पारंपरिक पद्धतीनं श्रीकृष्णाची पूजा केली जाते. येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीसारखा उत्सव होतो. दह्याची हंडी बांधून थर रचून ती फोडली जाते. नंतर सार्‍या मुली, स्त्रिया रंगाच्या पाण्याने मडकं फोडणार्‍यांना भिजवून टाकतात.

हत्तींचा उत्सव
बनारसमधील काही गावांत पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे. तर राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये होळीचा उत्सव हा हत्तींचा उत्सव (एलिफंट फेस्टिव्हल) म्हणून साजरा होतो. या उत्सवाच्या निमित्तानं हत्तींना सुंदर दागिने आणि मखमली झुल्यांनी सजवलं जातं.
होळीच्या दिवशी संध्याकाळी या हत्तींची सौंदर्य स्पर्धा घेतली जाते. तसंच हत्ती पोलो खेळ खेळतात आणि संगीताच्या तालावर नाचतातही! या व्यतिरिक्त बर्‍याच प्रांतांत रंगांनी, तर काही ठिकाणी फुलांनी हा सण साजरा करतात. 
तसं पाहिलं तर, सगळेच सण-उत्सव लहानमोठ्या प्रमाणावर साजरे करण्याची आपली परंपरा आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ वेगळा काढून, ताणतणाव विसरून आनंद उपभोगता यावा, यासाठी खरं तर या सणांचा प्रपंच. होळी पेटत असताना त्यात सर्वांच्या मनातील वाईटसाईट प्रवृत्ती जाळून टाकत, मन स्वच्छ करणं असो, नाहीतर वय-जात-धर्म-लिंग-आर्थिक स्तर वगैरे सगळे भेद विसरून मुक्त मनानं एकमेकांना रंगवणं असो, निखळ आनंद देण्याची क्षमता असलेल्या कित्येक प्रथा आपल्यापाशी आहेत. पण आज हे सगळे सण-उत्सव साजरे करण्याला एक वेगळं स्वरूप आलंय. प्रत्येक सण जसा काही इव्हेंट होत चालला आहे. त्यातील साधेपणा कुठेतरी हरवलाय.
हा पुन्हा मिळवून या सणांचा आनंद द्विगुणित करूया.

नटून थटून पंचीम आली (Fashion For Holi)