मुलांना वाढवताना पालकांनी आपल्या या 10 वाईट सवय...

मुलांना वाढवताना पालकांनी आपल्या या 10 वाईट सवयी सोडल्या पाहिजेत (Parents Should Give Up These Habits To Bring Up Children)

मुलांच्या योग्य संगोपनासाठी पालक म्हणून, आपल्या मुलांच्या सवयी समजून घेणं आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कारण मुलं आपल्या पालकांच्या सर्व चांगल्या-वाईट सवयी आत्मसात करत असतात. काही वेळा मुलं पालकांच्या चांगल्या सवयींचं अनुकरण करण्याऐवजी वाईट सवयीच अनुसरतात. ज्यामुळे त्यांच्या पुढील जीवनावर त्याचा परिणाम होतो. आता आपण पालकांच्या अशाच काही वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.
मुलांच्या विकासासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, तेव्हाच त्यांना त्यांची क्षमता आणि कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आपलं मूल आजूबाजू्च्या सर्वच गोष्टी ग्रहण करत असतं, यात पालकांच्या सवयी देखील आल्या. त्यामुळे पालकांना त्यांच्या दैनंदिनीतील सवयींबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. आपल्या पाल्याच्या संगोपनात अडचण आणणार्‍या सवयी पालकांनी सोडून दिल्या पाहिजेत.

1. टेलिव्हिजन पाहण्याची वेळ
पालकांसाठी तसेच मुलांसाठी देखील टी.व्ही. पाहण्याची एक निश्चित वेळ आणि मर्यादा हवी. पालकच तासन्तास टेलिव्हिजनच्या समोर बसून राहत असतील, तर मूलंदेखील तसंच करणार. कारण मुलांना त्यांच्या मनोरंजनासाठी टी.व्ही. हाच पर्याय आहे, असे वाटते. मग त्यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि तंत्रज्ञानाचा सतत वापर करण्याची वाईट सवय लागते. मागील काही वर्षांपासून मुलांमधील तंत्रज्ञानाच्या वापराची सवय वेगाने वाढत आहे. शिवाय याचा मुलांच्या बौद्धिक विकासावर वाईट परिणाम होत असल्याचेही संशोधनांती सिद्ध झालं आहे. एवढंच नव्हे तर मुलांच्या शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. तेव्हा मुलांनी किती वेळ टी.व्ही. पाहावा हे ठरविण्याआधी पालकांनी स्वतःची टी.व्ही. पाहण्याची वेळही मर्यादीत करणं आवश्यक आहे.

2. जोरजोराने ओरडणं
मानसशास्त्रज्ञांच्या मते, बहुतेक पालकांना सतत मुलांवर ओरडण्याची वाईट सवय असते. वास्तविक, छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलांना ओरडणे अजिबात योग्य नाही. पालकांच्या जोरजोराने ओरडण्याच्या वाईट सवयीचा मुलांवरही परिणाम होतो आणि हळूहळू तीच सवय त्यांच्यातही वाढू लागते. काही मुलं चिंता आणि नैराश्याला बळी पडतात. एवढंच नाही तर पालकांच्या या सवयीमुळे पालक आणि मुलांच्या नात्यामध्ये कटूता येऊ लागते. पालकांनी स्वत:वर नियंत्रण ठेवणं अधिक चांगलं. छोट्या मुलांना ओरडण्याऐवजी प्रेमानं समजावून सांगावं.

3. तुलना करणं
आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करणं ही पालकांची सर्वात वाईट सवय आहे. सर्वप्रथम, पालकांनी ही वाईट सवय सोडली पाहिजे आणि आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करण्याचा कधीही प्रयत्न करू नये. मुलांच्या वाढीवर आणि विकासावर त्याचा वाईट परिणाम होतो. पालकांच्या अशा वर्तनामुळे, मुलाचा आत्मविेशास डळमळीत होऊ लागतो आणि तो स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागतो. पालकांनी मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. असं केल्यानंतर पालकांना अपेक्षित असणारा बदल मुलांमध्ये नक्की दिसून येईल.
4. मारहाण करणं
असंख्य वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय अभ्यासात अनुभवानंतर असं नमूद करण्यात आलेलं आहे की, मुलांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हिंसा, अगदी लहानशी थप्पड देखील धोकादायक मार्गाने वेदनादायक असू शकते. भारतीय समाजात पालक बरेचदा अशा चुका करतात. छोट्या छोट्या गोष्टींवर पालक मुलांवर हात उचलतात, त्यांना मारहाण करतात. पालकांनी मुलांना समजावून सांगण्याचा हा मार्ग मुळीच योग्य नाही. मुलांवर वारंवार हात उगारून ती बंडखोर होतात.

5. सल्ला कमी नि प्रेरणा जास्त
बहुतेक पालक मुलांनी काय करावं आणि काय करू नये याबद्दल सतत त्यांची शिकवणी घेत असतात. पालकांच्या अशा सवयीमुळे मुलं स्वतंत्रपणे काही करताना कचरतात. यावर बाल मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की, पालकांनी मुलांना सल्ला द्यावयास काहीच हरकत नाही, परंतु काही प्रमाणात. पालकांनी स्वतःच्या इच्छांचं ओझं त्यांच्यावर थोपू नये. त्यांना काम करण्यास प्रोत्साहित करावं. जेव्हा पालक स्वतः पहिलं पाऊल उचलतील तेव्हाच मुलांना प्रोत्साहन मिळेल.

6. गप्पा मारणं
काही पालकांना गप्पा मारण्याची वाईट सवय असते. त्यांची ही सवय नंतर मुलांमध्ये येते आणि मुलं त्यांच्या मित्रांसमवेत बराच वेळपर्यंत गप्पा मारू लागतात, जे त्यांच्या वयानुसार चुकीचं आहे.

7. शरीरयष्टीवरून मुलांना लाजवणं
आपलं मूल खूप बारीक किंवा खूप लठ्ठ असलं तरी पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या शरीररचनेवरून दोष देऊ नये. मुलांना सतत तो अशक्त वा स्थूल असल्यामुळे टोकणे, यामुळे मुलांमध्ये निराशा येऊ शकते. मुलं चिंताग्रस्त होतात आणि त्यांच्यात आत्मविेशासाचा अभाव निर्माण होतो. तेव्हा पालकांनी आपल्या मुलाचे दोष दाखवून त्यांना लाजवण्याऐवजी त्यांच्या सकारात्मक गुणांवर भर दिला पाहिजे.
8. अपमानित करणं
मुलांच्या विकासासाठी त्यांना प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. परंतु, त्यांना शिवीगाळ करणं, त्यांचा अपमान केल्यानं मुलांच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, मुलांना अपमानित करणं हे शारीरिक अत्याचारात मोडत नाही, परंतु मानसिक आणि भावनिक अत्याचार म्हणून त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि याचा मुलांच्या मानसिक आणि भावनिक जीवनावर देखील परिणाम होतो. म्हणूनच मुलास सामाजिकदृष्ट्या इतर लोकांशी संपर्क साधण्यास प्रवृत्त करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्यात आत्मविेशास वाढेल.

9. धूम्रपान
काही पालक आपल्या मुलांसमोर धूम्रपान करतात. शिवाय यात त्यांना काही चुकीचं वागतोय असंही वाटत नाही. परंतु, त्यांच्या या सवयीमुळे मुलांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांची फुफ्फुसं अद्याप पूर्ण विकसित झालेली नसतात आणि धूम्रपान केल्यामुळे अविकसित फुफ्फुसं कमजोर होतात आणि आजार निर्माण करतात. या व्यतिरिक्त, मुलं मोठी होऊ लागताच, गुपचूप पालकांच्या या सवयीचं अनुसरण करू लागतात.

10. मद्यपान
पालक हे मुलांसाठी आदर्श असतात. म्हणूनच पालकांनी त्यांच्यासमोर मद्यपान करणं टाळलं पाहिजे. काही पालक मद्यपानानंतर मुलांवर ओरडतात. त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलतात. त्यामुळे घरात भांडणं होतात, ज्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
आई-वडिल हेच मुलांचे पहिले गुरू अर्थात शिक्षक असतात. मुलं समजण्याच्या वयात येईपर्यंत पालकांच्याच पावलावर पाऊल टाकून चालत असतात. अर्थात मुलं पालकांच्या चांगल्या-वाईट अशा सगळ्याच गोष्टींचं अनुकरण करत असतात. त्यामुळे पालक हे मुलांसाठी आदर्शवत असतात. मुलांना आपल्या पालकांसारखं व्हायचं असतं. अशावेळी पालकांच्या वागण्यातून काही चूकीचे संदेश मुलांना मिळाले, तर मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम कायम राहतो. म्हणूनच पालकांनी आपली जबाबदारी ओळखून आधी स्वतःच्या वाईट सवयींना मुरड घातली पाहिजे. त्यासाठी गरज पडल्यास मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेण्यास हरकत नाही.