पखवाजवादक तरुणीचे पुरुष मक्तेदारीस आव्हान (Pakh...

पखवाजवादक तरुणीचे पुरुष मक्तेदारीस आव्हान (Pakhawaj Player Young Girl’s Challenge To Men)

‘पखवाज’ हे मुख्यत्वे पुरुष वादकांचा अंमल असणारं वाद्य आहे. परंतु या परंपरेला छेद देत पखवाज वादनात ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महिला आहेत त्यातील अग्रगण्य नाव आहे गार्गी देवदास शेजवळ! गार्गी ही पहिल्या वर्गात पखवाजात एम.ए. उत्तीर्ण होणारी जगातील पहिली महिला कलाकार आहे.

‘ज्ञानेश्‍वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा वारकर्‍यांचा एकच गजर नि या गजराला साथ टाळ-मृदुंगाची! टाळांचा अविरत गजर नि हृदयाचा ठाव घेणारा मृदुंगाचा चैतन्यमय ध्वनी म्हणजे भक्तिरसात आकंठ बुडालेल्या मनाची ’ब्रह्मानंदी टाळी‘च! तालाच्या आवर्तनाची वर्तुळं निर्माण करून चिरतंद्रेची अनुभूती देणारं एक वाद्य म्हणजेच मृदुंग. आणि या मृदंग वाद्याचाच एक प्रकार म्हणजे ‘पखवाज’.
प्राचीन अवनबद्ध वाद्यांच्या ‘पुष्कर वाद्य’ गटातील उत्तरकालीन विकसित होत गेलेलं ‘पखवाज’ हे एक आद्यवाद्य आहे. ‘पखवाज’ हा ‘पक्षवाद्य’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. या वाद्याला दोन मुखं आहेत आणि दोन्ही बाजूंनी व दोन्ही हातांनी हे वाद्य वाजवलं जातं म्हणून या वाद्याचं नाव पखवाज.

आद्य पखवाजवादक गणपती
पखवाज या आदिवाद्याशी निगडीत अनेक आख्यायिका आहेत. पैकी सर्वप्रचलित अशी पखवाज वादनाची कथा आहे ती श्रीगणपतीची! भारतीय संस्कृतीत चौसष्ट कलांचा अधिपती असलेला गणपती हा आद्य पखवाजवादक मानला जातो. यामागील कथा अशी आहे की, एकदा राक्षसाचा वध केल्यानंतर श्री शिवशंकर अत्यंत क्रोधीत होऊन तांडवनृत्य करीत होते. काही केल्या त्यांचा क्रोधाग्नी शांत होत नव्हता. समस्त देव चिंतीत होते. शंकर भगवानांचा क्रोध सगळं काही भस्मसात करेल की काय अशी भीती निर्माण झाली होती. अशा कठीण प्रसंगी श्री गणपतींनी जोरजोरात पखवाज वादन सुरू केले. शिव शंकरांच्या तांडव नृत्याशी ताल धरणारी द्रुत लय पहिल्यांदा श्री गणपतींनी पकडली नि मग श्री गणपती पखवाजाची लय हळूहळू संथ करीत गेले. शिवशंकर पखवाजाच्या तालाशी इतके एकरूप झाले होते की पखवाजाची लय जसजशी संथ होत गेली तसतसा शंकर भगवानांचा क्रोधही त्या लयीत मिसळून संथ होत अखेर शांत झाला.
मनाची तंद्री लावणारं पखवाज हे केवळ आद्यवाद्यच नाहीय् तर एक मंगल वाद्यही आहे. धर्म संगीतात पखवाजाचे स्थान अबाधित आहे. वारकरी भजन तर पखवाजाशिवाय होतच नाही. पखवाजाचा ध्वनी अत्यंत गंभीर, गुंजनयुक्त आणि अत्यंत गरिम्याचा असतो. पखवाजाला ‘गजगती’ लयीचे वाद्य असेही म्हटले जाते. पखवाज खाली बसून दोन्ही हातांच्या पंजाच्या जोरदार आघातांनी वाजवतात. तसेच, कीर्तनाच्या वेळी तिवईवर ठेवून उभ्यानेदेखील वाजवला जातो. वारीत पखवाज गळ्यात बांधून चालत, नाचतही वाजवतात. पखवाज हे वाद्य धार्मिक संगीत व शास्त्रीय संगीत या दोन्ही संगीतात वाजवलं जातं.

जगातील पहिली महिला पखवाजवादक
‘पखवाज’ हे मुख्यत्वे पुरुष वादकांचा अंमल असणारं वाद्य आहे. परंतु या परंपरेला छेद देत पखवाज वादनात ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महिला आहेत त्यातील अग्रगण्य नाव आहे गार्गी देवदास शेजवळ! गार्गी ही पहिल्या वर्गात पखवाजात एम.ए. उत्तीर्ण होणारी जगातील पहिली महिला कलाकार आहे. जन्मतःच जणू गार्गीची संगीताशी नाळ बांधली गेलेली होती. गार्गीच्या पणजोबांपासूनच शेजवळ कुटुंबाला संगीताचा वारसा लाभला आहे. आज मुंबईस्थित असणारं शेजवळ कुटुंब हे मूळचं जुन्नर येथील अंबेगाव तालुक्यातील. गार्गीचे आजोबा सावळारामबुवा शेजवळ हे भजन गायचे. भजनगायनात सावळारामबुवांनी नवीन प्रवाह आणला होता. त्यांनी भजनांना शास्त्रीय संगीतातील चाल देण्याची पद्धत प्रचलित केली. तसेच, भजनगायनात त्यांनी हार्मोनिअमही आणले. सावळारामबुवांमध्ये असलेला हा नाविन्यतेचा ध्यास नि संगीताची आस संपूर्ण शेजवळ कुटुंबातच झिरपली. सावळारामबुवांनंतरच्या तीनही पिढ्यांनी संगीत क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे. आणि आजही देत आहेत. या कुटुंबातील पखवाज वादनातील दोन अग्रगण्य नावं आहेत, गार्गीचे आजोबा पंडित अर्जुन शेजवळ आणि काका पंडित प्रकाश शेजवळ. महाराष्ट्रात आपल्याला पखवाजवादनास प्रामुख्याने तीन घराणी दिसतात. मृदुंगाचार्य नानासाहेब पानसे घराणे, कुदवसिंग घराणे आणि नाथद्वारा घराणे. पं. अर्जुन शेजवळ, पं. प्रकाश शेजवळ आणि आता गार्गी शेजवळ यांचे पखवाज वादन हे मृदुंगाचार्य नानासाहेब पानसे घराण्याचे!

हे मुलींचं वाद्य नाही, हे पुरुषांचं वाद्य आहे
घरातील संगीतमय वातावरणात वाढणार्‍या गार्गीला अगदी बालपणापासूनच संगीताची नि वाद्यांची एक अनामिक ओढ होती. गार्गी पाच वर्षांची असेल तेव्हाची गोष्ट. गार्गीचे लहान आजोबा निधन पावले नि त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी घरात भजन होते. भजनाचं सगळं साहित्य ओटीवर मांडून ठेवलेलं होतं. हार्मोनियम, टाळ, तबला नि पखवाजसुद्धा! छोटी गार्गी ही सगळी तयारी कुतूहलाने न्याहाळत होती आणि अचानक तिच्या मनाने उचल खाल्ली नि ती पखवाजाच्या समोर जाऊन बसली. दोन्ही पंजांनी जोरजोरात पखवाज वाजवू लागली. घरातली सगळी मंडळी व पाहुणेमंडळीही गार्गीभोवती गोळा झाली. त्यातील एकाने दटावणीच्या सुरात गार्गीला सांगितले, “इथून ऊठ चल आधी. हे मुलींचं वाद्य नाही. हे पुरुषांचं वाद्य आहे.” पखवाज वादनात रममाण झालेल्या गार्गीच्या मनात इथेच ठिणगी पडली आणि पखवाज वादनाविषयी गार्गीच्या मनात एक अनामिक ओढ व जिज्ञासा निर्माण झाली.
गार्गीच्या आयुष्याला कलाटणी देणारा असाच एक प्रसंग घडला गुरुपौर्णिमेच्या दिवशी. गार्गी आपल्या बाबांसोबत तिचे काका पं. प्रकाश शेजवळ यांच्याकडे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी गेली होती. पं. प्रकाश शेजवळ यांनी पखवाजावर ‘दोहाती परण’ वाजवलं. ते ऐकून गार्गी इतकी भारावून गेली की तिने बाबांकडे पखवाज वादन शिकण्याचा हट्ट धरला. तिसरी-चौथीत असणार्‍या गार्गीच्या हट्टाकडे तिच्या बाबांनी पहिल्यांदा केवळ एक बालहट्ट म्हणून पाहिले. पण गार्गीने मात्र आपला ध्यास सोडला नाही आणि अखेर गार्गीचे पखवाज वादनाचे रीतसर शिक्षण सुरू झाले.
सुरुवातीला गार्गीच्या बाबांनीच गार्गीला पखवाज वादनाचे धडे दिले. पण नंतर पखवाज वादनातील तिची निपुणता पाहून पखवाज वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी तिच्या बाबांनी तिला पं. प्रकाश शेजवळ यांच्याकडे पाठवले. काका-पुतणीचं नातं आता गुरू-शिष्यात बदललं. पखवाज वादन शिकता-शिकता गार्गीने मराठी साहित्यात आपले एम.ए.ही पूर्ण केले. क्रिकेटची आवड असणार्‍या गार्गीने कराटेमध्येही नॅशनल लेवलला पाच गोल्ड मेडल्स मिळवली आहेत.
मूलतः पखवाज वादनात निपुण असणार्‍या गार्गीला याच विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्याची इच्छा होती. यामुळेच तिने 2019-20 या शैक्षणिक वर्षात पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित केंद्रात पखवाज वादनात एम. ए. करण्यासाठी प्रवेश घेतला. गुरुकुल पद्धतीने गार्गीचा ’पखवाज‘चा एम.ए.चा अभ्यासक्रम सुरू झाला. एम. ए. च्या वर्गातील ती एकमेव मुलगी होती. पण एकमेव मुलगी असण्याचा तिला त्रासही सहन करावा लागला.

गुप्रिझममुळे एकटी पडली गार्गी
आजच्या प्रगत आधुनिक काळात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात काम करीत आहेत असे चित्र आपल्याला पाहायला मिळते. पण हे चित्र दिसत असले तरी त्यामागची वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. गार्गीसोबत वर्गात असणार्‍या सर्व पुरुष पर्शेनिस्टस्ने जणू काही गार्गीवर बहिष्कारच टाकला होता. त्यांच्या गुप्रिझममुळे एकटी पडलेली गार्गी पहिल्यांदा मनाने थोडीशी खचली. पण गार्गीचे कुटुंब व तिच्या हॉस्टेलमधल्या मैत्रिणींनी तिचे मनोबल वाढवले. यामुळे प्रतिकूल परिस्थितीत गार्गीचा आत्मविश्‍वास एवढा वाढला की तिने अधिकाधिक अभ्यास व रियाज करून या संकुचित मनोवृत्तीच्या पुरुषांना एकाप्रकारे ‘हम में कितना है दम’ याची प्रचितीच घडवली. गार्गी एम. ए. केवळ पहिल्या वर्गातच उत्तीर्ण झाली नाही तर तिच्या या यशाने एक ऐतिहासिक नोंद केली.
पखवाज वादनात पहिल्या वर्गात एम. ए. करणारी गार्गी शेजवळ ही जगातील पहिली महिला ठरली. तिच्या या यशात तिचे कुटुंबीय, तिचे गुरु पं. प्रकाश शेजवळ यांच्याबरोबरच महत्त्वाचा वाटा आहे तो तिच्या ललित कला केंद्रातील गुरूंचा, ललित कला केंद्रातील गार्गीचे गुरु पं. उमेश मोघे, पं. ज्ञानेश्‍वर देशमुख आणि पं. गोविंद भिल्लारे (जे आज हयात नाहीत.) यांनी गार्गीला बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य केले. ज्यामुळे ती मैलाचा दगड गाठू शकली.

रियाज आणि उत्तमोत्तम संगीताचं श्रवण हा गुरुमंत्र
गार्गीने आत्तापर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक सांगीतिक कार्यक्रमांत आपला लक्षणीय सहभाग नोंदवलेला आहे. दरवर्षी मृदुंगाचार्य नानासाहेब पानसे यांची पुण्यतिथी केवळ मध्यप्रदेश व मुंबई या दोन ठिकाणीच होते. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात गार्गीने आपल्या गुरूंसोबत पखवाज वादन केले आहे. तसेच तिचा उल्लेखनीय परफॉर्मन्स म्हणजे भोपाळमध्ये भारतातील पखवाज वादकांचे पहिलेच पखवाज पर्व आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात पखवाज वादन करणारी गार्गी ही पहिली महिला कलाकार होती. मुंबई, पुणे तसेच भारतातील विविध ठिकाणी गार्गी आपल्या गुरूंसोबत पखवाज वादन करत असते. गार्गीला आत्तापर्यंत बरेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळालेले आहेत.

गार्गीच्या या यशोगाथेचा प्रवास पाहिल्यावर प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात येते की काही गुण, कला आपल्याला निसर्गतःच देणगी म्हणून मिळतात. हा एक दैवी योगच म्हणावा लागेल. पण या गुणांचं चीज करायचं असेल तर तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि मेहनती वृत्तीही हवी, तरच आपला यशोमार्ग सुफल होतो. पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या पखवाज वादनक्षेत्रात पुरुषी अहंकाराला न जुमानता स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी गार्गी शेजवळ हे याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
‘रियाज आणि उत्तमोत्तम संगीताचं श्रवण’ या गुरुमंत्राचे काटेकोरपणे पालन करणार्‍या पखवाज वादक गार्गीला तिच्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी लक्ष-लक्ष शुभेच्छा!

अश्‍विनी शिंदे-भोईर (अ‍ॅश फीचर एजन्सी)