दीपा-कार्तिकच्या लग्नात पैठणी आणि पारंपरिक मराठ...

दीपा-कार्तिकच्या लग्नात पैठणी आणि पारंपरिक मराठमोळ्या पोशाखाला पसंती (Paithani Is The Costume Theme For Grand Wedding Ceremony In Marathi Serial “Rang Maza Vegla”)

स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आलाय. आपापसातले हेवेदावे विसरुन दीपा-कार्तिक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. मेहंदी, हळद आणि संगीत साग्रसंगीत पद्धतीने पार पडल्यानंतर आता विवाहसोहळ्याकडे साऱ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. दीपा-कार्तिकचा मेहंदी, हळद आणि संगीत सोहळ्यातला लूक भाव खाऊन गेला. लग्नामध्येही संपूर्ण कुटुंब पारंपरिक मराठमोळा पोशाख परिधान करणार आहेत.

पिवळ्या रंगाच्या नऊवारी पैठणीमध्ये दीपाचं सौंदर्य खुलून आलं आहे. तर तिकडे कार्तिकनेही धोतर आणि पैठणीची पगडी घालत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. पैठणी ही थीम असल्यामुळे दीपिका आणि कार्तिकीने नऊवारी पैठणी नेसून ही थीम फॉलो केली आहे.

सौंदर्या इनामदारच्या स्टाईल स्टेटमेण्टची तर नेहमी चर्चा असते. कार्तिक-दीपाच्या लग्नातही सौंदर्याच्या लूकची चर्चा असणार आहे. लाल रंगाची साडी आणि त्यावर साजेसे राजेशाही दागिने घालत सौंदर्या इनामदारने नटण्याची हौस भागवून घेतली आहे. 

दीपा-कार्तिकच्या लग्नाची धामधूम सुरु असली तरी आयेषा लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करणार आहे. सगुणा आजीचा वेष धारण करुन आलेल्या आयेषाचा हा प्लॅन यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.