बीजमाता राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai: Moth...

बीजमाता राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai: Mother Of Desi Seeds)

देशी बियाण्यांचं जतन आणि संवर्धन करणार्‍या राहीबाई पोपेरे यांना यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी सुरू केलेल्या बियाणे बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत.

नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर ठसठशीत कुंकू, नाकात मोठाली नथ आणि ओठांवरचं स्मित… हे अस्सल गावरान रूप पाहिलं की, मन प्रसन्न होतं आणि या बाईंना मानद ‘पद्मश्री’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, हे कळताच चकीत व्हायला होतं. ही अस्सल मातीतली व्यक्ती आहे, राहीबाई पोपेरे. त्यांचं कामही या गावरान मातीशीच जोडलेलं आहे. देशी बियाण्यांचं जतन आणि संवर्धन करणार्‍या राहीबाईंनी बियाणे बँक सुरू केली आहे. आणि या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत.
कृषिप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात शेतीच्या पारंपरिक पद्धतीपासून आधुनिक पद्धतीपर्यंत अनेक प्रयोग होताना दिसतात. हरितक्रांतीमुळे आपल्या देशातील कृषी क्षेत्राचा कायापालट झाला. झटपट पीक मिळवण्याच्या अट्टहासापायी शेतकरी संकरित (हायब्रीड) बियाण्यांचा अधिकाधिक वापर करू लागले. यामुळे उत्पन्न वाढलं, मात्र जमिनीपासून ते खाणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यापर्यंत अनेक दुष्परिणाम दिसू लागले. या संकरित बियाण्यांमुळे पारंपरिक, गावरान वाणांच्या वापराकडे, जतनाकडेही दुर्लक्ष झालं. भलेभले या मोहजालात अडकत असताना अहमदनगरमधील अशिक्षित, आदिवासी राहीबाईंनी मात्र पारंपरिक गावरान देशी वाणाचं महत्त्व जाणलं आणि त्याचं जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले.

बालपणीचा छंद
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामधील कोंभाळणे या खेडेगावात 56 वर्षीय राहीबाई पोपेरे राहतात. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इतर मुलांप्रमाणेच त्या आईवडिलांना शेतीकामात मदत करायच्या. अर्थात, लहानपणापासूनच आईवडिलांच्या हाताखाली त्यांचं शेतीविषयक अनौपचारिक शिक्षण सुरू झालं. लहानपणापासून त्यांना बियाणं जमवण्याचा छंद होता. बियाणं ओळखण्याचं आणि त्याचं जतन करण्याचं ज्ञान-कौशल्य त्यांना वडिलांकडून अवगत झालं होतं. मात्र बरीच वर्षं हे केवळ छंद म्हणूनच सुरू होतं.
गावात कुपोषण, आजारपणाच्या घटना वाढताहेत हे त्यांच्या लक्षात येत होतं. यामागे काय कारण असावं, हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. संकरित बियाण्यांचा विपरीत परिणाम लोकांच्या रोग प्रतिकारक क्षमतेवर होत असावा, असं त्यांचं मन सांगत होतं. म्हणून त्यांनी आपल्या परीने त्यावर एक उपायही  शोधला. तो उपाय होता, पारंपरिक वाणांचा. पारंपरिक वाण म्हणजे, स्वतः शेतात पिकवलेल्या पिकातील काही भाग बियाण्यांसाठी राखून पुढील वर्षाच्या पेरणीसाठी वापरणं. असे वाण (बियाणं) कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता किंवा किरणोत्सर्गी प्रक्रिया न करता पुनरुत्पादन करण्यासाठी वापरले जाते.

जनजागृती मोहीम
यानुसार राहीबाईंनी स्वतः पारंपरिक वाणांचा वापर करून शेती करण्यास सुरुवात केली. त्यावरून अनेकांनी त्यांना वेड्यातही काढलं. मात्र त्या डगमगल्या नाहीत. वाण गोळा करण्याच्या छंदाने भरारी घेतली होती. त्या पारंपरिक पद्धतीने वाण गोळा करून ते शेतीमध्ये वापरू लागल्या. हळूहळू लोकांनाही या देशी वाणांचं महत्त्व पटू लागलं. ते राहीबाईंकडून मार्गदर्शन घेऊ लागले. कसदार शेतीसाठी आणि संकरित बियाण्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, देशी गावरान वाणांचं जतन आणि त्यांचा शेतीसाठी वापर करण्याबाबत राहीबाई जनजागृती मोहीम राबवू लागल्या.
गावरान आणि दुर्मीळ देशी वाण जपण्याचं हे कार्य त्या गेल्या 20 वर्षांपासून करत आहेत. गावरान वाण शोधून त्यांची लागवड करणं, ते इतरांना देणं, आलेल्या पिकातून वाणाची जपणूक करणं, अशा प्रकारे सुरू झालेल्या या प्रवासाने आता बियाणे बँकेचा टप्पा गाठला आहे. ‘बीएआयएफ’ या सेवाभावी संस्थेच्या मदतीने राहीबाई ही अनोखी बँक चालवत आहेत. त्यांच्या या बँकेत पांढरं वांगं, हिरवं वांगं, गोड वाल, कडू वाल, पताडा घेवडा, बटूका घेवडा, पांढरा तूर, सूर्यफूल, टोमॅटो, उडीद, हरभरा हुलगा, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमूग, जवस, तांदूळ, राळा, नाचणी, रायभात अशा रानभाज्या आणि अनेक प्रकारच्या 53 पिकांच्या 114 गावरान वाणांचा समावेश आहे. या बँकेमार्फत आत्तापर्यंत हजारो गरजू शेतकर्‍यांना गावरान वाणांचा पुरवठा केला जातो. राहीबाईंनी त्यांच्या घराशेजारील तीन एकर परिसरात 400 ते 500 वेगवेगळ्या गावरान झाडांची लागवड केली आहे.

आदिवासी दुर्गम भागात बियाण्यांची बँक चालवणार्‍या राहीबाई पोपेरे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यंदा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2019मध्ये त्यांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.