ओटीटी प्लॅटफॉर्म वर अॅक्शन आणि थरारपटांची लयलू...

ओटीटी प्लॅटफॉर्म वर अॅक्शन आणि थरारपटांची लयलूट (OTT Platform To Release Star Studded Action And Thriller Films, Web Series )

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ओटीटीवर काय प्रदर्शित होणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ओटीटीची वाढती लोकप्रियता लक्षात घेता निर्माते दर आठवड्याला नवनवीन विषय घेऊन येत असतात. एवढेच नाही तर आता चित्रपटगृहांप्रमाणेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात देखील विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे कंटेंट रिलीज होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजबद्दल.

खुदा हाफिज २

विद्युत जामवालचा अॅक्शनने भरलेला ‘खुदा हाफिज 2’ हा चित्रपट चित्रपटगृहानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट नक्की जादू दाखवेल अशी विद्युतच्या चाहत्यांची आशा आहे. आजपासून हा चित्रपट Zee5 वर प्रसारित होणार आहे.

राष्ट्र कवच ओम

आदित्य रॉय कपूरची प्रमुख भूमिका असलेला राष्ट्र कवच ओम हा चित्रपट १ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आता हा चित्रपट पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आदित्य रॉय कपूरचा हा चित्रपट ओटीटीवर चालतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टपासून झी5 वर प्रदर्शित होणार आहे.

आय एम ग्रूट

मार्वल स्टुडिओची नवीन सिरीज आय एम ग्रूट या आठवड्यात डिस्ने हॉट स्टारवर १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ग्रूट नावाचे पात्र अनेक मार्वल चित्रपटांमध्ये दिसले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आवड लक्षात घेता मार्वलने त्यावर संपूर्ण सिरीज तयार केली आहे. या सिरीजचा पहिला भाग या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.

इंडियन मॅचमेकिंग (सीजन 2)

नेटफ्लिक्सचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो इंडियन मॅचमेकिंगचा दुसरा सीझन या आठवड्यात १२ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या सीझनला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

हिट द फर्स्ट

गेल्या महिन्यात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा हिट द फर्स्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 15 ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रासोबतच जतिन गोस्वामी, अखिल अय्यर, मिलिंद गुणाजी, शिल्पा शुक्ला, दलीप ताहिल आणि संजय नार्वेकर प्रमुख भूमिकेत दिसतील.

शाबाश मिथू

भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित शाबाश मिथू हा चित्रपट १५ जुलैला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसली आहे. तुम्हाला जर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहता आला नसेल तर आता तो तुम्हाला १५ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

द वॉरियर

‘एन. ‘लिंगू स्वामी’ दिग्दर्शित ‘द वॉरियर’ देखील या आठवड्यात OTT वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राम पथोनेनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अॅक्शन आणि थराराने भरलेला हा चित्रपट १५ ऑगस्टला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे,