यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच ख...

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच खास, दोन पुरस्कारांवर कोरले नाव (Oscar Awards 2023)

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.

ज्या क्षणाकडे तमाम प्रेक्षक अन्‌ चाहते डोळे लावून बसले होते तो सुवर्णक्षण याची देही याची डोळा लाखो जणांनी अनुभवला आहे. एस एस एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय चित्रपट विश्वाला तब्बल १४ वर्षांनी ऑस्कर मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व तितकेच मोठे आहे. यापूर्वी ए आर रहमान यांच्या जय हो या गाण्याला सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तर –

The Elephant Whisperers या ४१ मिनिटाच्या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार पटकावत भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे. या लघुपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘पगलैट’, ‘द लंचबॉक्स’ आणि ऑस्कर विजेता शॉर्ट डॉक्यूमेंटरी ‘पीरियड अँड ऑफ सेंटेंस’ची निर्मिती केली आहे. ३९ वर्षांच्या गुनीत मोंगा या सिख्या एंटरटेनमेंटच्या संस्थापक व सीईओ आहेत.

सध्या दोन ऑस्कर मिळाल्याने देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. तर सेलेब्सकडूनही विजेत्यांचं अभिनंदन करणं सुरु आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ट्विट करत या अभिमानास्पद क्षणाबद्दल देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलयं, ‘नाटू नाटू’ची लोकप्रियता जागतिक आहे. पुढील अनेक वर्षे स्मरणात राहणारे हे गाणे आहे. संगीतकार एम एम कीरावानी, गीतकार चंद्रबोस यांचे आणि या प्रतिष्ठित सन्मानासाठी संपूर्ण टीम अभिनंदन अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाचे माजी उपराष्ट्रपती आणि दिग्गज नेते एम व्यंकय्या नायडू यांनीही संघाचे अभिनंदन केले. चित्रपटाच्या गाण्याचे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले, ऑस्कर जिंकून इतिहास रचल्याबद्दल संगीतकार एम एम कीरावानी, गीतकार चंद्रबोस, दिग्दर्शक राजामौली आणि #RRR टीमचे खूप खूप अभिनंदन.

साऊथ स्टार आणि बाहुबली फेम राणा दग्गुबती याने पुरस्कार सोहळ्यातील व्हिडिओ शेअर केला असून पुरस्कार जिंकल्याबद्दल चित्रपटाचं अभिनंदन केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनेही दोन्ही ऑस्कर विजेत्या चित्रपटांचे अभिनंदन केले आणि इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले. विषेश म्हणजे आलिया देखील या चित्रपटाचा एक भाग होती आणि तिने यात एक छोटी भूमिका साकारली होती. याशिवाय अजय देवगणही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

Oscars 2023 RRR Wins

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर इतके उत्साहित झाले की पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आरआरआरच्या टीमचे अभिनंदन केले.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील ऑस्कर सोहळ्याचा आनंद लुटत असून तिनेही पुरस्कार विजेत्या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांच्याशिवाय कंगना रणौतनेही RRR टीमचे अभिनंदन केले आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल देशाचे आभार मानले. लोकांना ही मोठी बातमी कळू लागल्याने या दुहेरी आनंदाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहे