आधुनिक सुविधांचं ऑनलाइन प्लॅटफॉर्म (Online Plat...

आधुनिक सुविधांचं ऑनलाइन प्लॅटफॉर्म (Online Platform of Modern Amenities)

आहार, फॅशन, आरोग्य, व्यवस्थापन, स्वसंरक्षण… याबाबतच्या कोणत्याही सल्ल्यासाठी संबंधित अ‍ॅपवर लॉग-इन करा आणि उपयुक्त सुविधांचा लाभ घ्या.

आधुनिक तंत्रज्ञानानं अनेक गोष्टी आपल्यासाठी सुलभ करून दिल्या, देत आहे आणि यापुढेही देत राहील. परंतु या सुविधांचा लाभ घेणं आपल्याला पूर्णतः जमलेलं नाही. कधी कधी या सुविधांबद्दल अज्ञान असतं, म्हणजे अमुक एक गोष्ट कशासाठी, कशी वापरायची हेच माहीत नसतं. आता अ‍ॅपचंच बघा… मोबाइलवर सहजपणे हाताळता येईल असं विविध माहितीनं भरलेलं ‘अ‍ॅप’ नावाचं भांडार म्हणजे आपल्याला हवं ते ज्ञान तिथल्या तिथं मिळवून देणारं एक विश्‍वसनीय व्यासपीठ. केवळ लॉग इन करण्याचा अवकाश…  खरोखर आपण सगळ्यांनी आपल्यासाठी असलेल्या या अ‍ॅपचा फायदा करून घेतला पाहिजे. काही महत्त्वाच्या अ‍ॅप खालीलप्रमाणे- 

डेली योगा अ‍ॅप
जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही, अशी सगळ्याच स्त्रियांची तक्रार असते. अशा स्त्रियांना ‘डेली योगा अ‍ॅप’चा विशेष फायदा होणार आहे. या अ‍ॅपमध्ये 50 हून अधिक योगा सेशन, 500 हून अधिक योगा पोजेस, बॅकग्राऊंड म्युझिकसह 18 एचडी व्हिडिओ आणि लाइव्ह व्हॉइस इंस्ट्रक्शन (व्यायामाच्या प्रत्येक स्टेपसाठी) देण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपमध्ये स्त्रियांसाठी फिटनेस, स्टॅमिना आणि वेट लॉससाठी सात दिवसांचा खास योगाभ्यास दिलेला आहे.

हेल्दीफाय मी अ‍ॅप
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ही अतिशय उपयुक्त अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या मदतीने स्त्रिया अगदी सहजपणे आपल्या कॅलरीज काऊंट करून आपलं वजन घटवू अथवा वाढवू शकतील. वर्किंग वुमन असो वा गृहिणी, दोहोंच्या आरोग्यासाठी खास डाएट प्रोग्रॅम यात देण्यात आलेला आहे. शरीरातील आर्द्रतेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी या अ‍ॅपमध्ये वेळोवेळी पाणी पिण्यास सांगणारा रिमाईंडर उपलब्ध आहे.

एव्हरनोट अ‍ॅप
वर्किंग वुमनसाठी ही सुयोग्य अ‍ॅप आहे. ज्या स्त्रियांना सुनियोजित काम करण्याची सवय आहे. अशा स्त्रिया अ‍ॅपच्या मदतीने कॉर्पोरेट प्लॅन्स बनवू शकतात. आपल्या प्लॅन्सच्या संबंधित नोट्स काढणे, स्क्रीन शॉट आणि इमेज सेव्ह करणे देखील या अ‍ॅपमुळे त्यांना सोपे जाणार आहे. तसेच या स्त्रियांना आपले प्लॅन्स चॅटद्वारे इतरांशी शेअरही करता येणार आहेत. या अ‍ॅपद्वारे तुम्ही महत्त्वपूर्ण नंबर्स सेव्ह करू शकता, त्यापासून बिझनेस कार्ड बनवून ठेवू शकता.

मिंट अ‍ॅप
स्त्रियांना महिन्याच्या जमाखर्चाबाबत जागरूक ठेवण्यासाठी ही महत्त्वाची अ‍ॅप आहे. महिन्याचं बजेट नियोजित करून आयकराविषयीची तरतूद करता येणं या अ‍ॅपमुळं शक्य होईल. स्त्रियांना एखाद्या योजनेत पैशांची गुंतवणूक करावयाची असल्यास, आपण महिन्याला किती खर्च केला पाहिजे याचा अंदाजही यामुळे येईल.

स्प्लिटवाइज अ‍ॅप
या अ‍ॅपमुळे स्त्रियांना आपली आर्थिक मिळकत कशी वाढवायची, कशी वापरायची याबाबतचा सल्ला मिळेल. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. हा अ‍ॅप वेळोवेळी आपला बॅलन्स तपासत राहील. या अ‍ॅपमध्ये एक रिमाईंडर इमेल सेट करता येणार आहे.

कुकव़िझ मी अ‍ॅप
दररोज न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यात कोणते पदार्थ बनवायचे, या विचाराने सर्वच स्त्रिया त्रस्त असतात. या स्त्रियांसाठी ‘कुकविझ मी’ अ‍ॅपमध्ये रोज बनविता येण्यासारख्या अनेक पाककृती मिळतील. हे पदार्थ बनवायला सोपे आणि स्वादिष्ट आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने स्त्रिया आपल्या आवडीच्या पाककृतीदेखील शोधू शकतात.

द हंट फॅशन अ‍ॅप
विलक्षण अशा फॅशनची आवड असणार्‍या स्त्रियांना या अ‍ॅपवर लेटेस्ट फॅशन अपडेट्स येत राहतील. त्यामुळे त्यांना नवीन नवीन ट्रेण्ड्स आणि स्टाइलबाबत माहिती मिळेल. या पर्यायांतून आपला ट्रेंड लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या कपड्यांची निवड करू शकतील. शिवाय आपल्याला आवडलेला ड्रेस मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करू शकतील.

स्ट्रेस अ‍ॅण्ड एंग्झायटी रिलीफ अ‍ॅप
ऑफिस, घर, तेथील कर्तव्यं, कौटुंबिक स्वास्थ्य असं सगळंच सांभाळता सांभाळता स्त्रिया ताण-तणाव, चिंता अशा मानसिकतेतून जात असतात. या सगळ्यांमुळे तिचं आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते. खरं तर या कोणत्याही जबाबदार्‍यांतून तिची सुटका नाही. परंतु त्यामुळे निर्माण होणारी तणावपूर्ण परिस्थिती मात्र काही प्रमाणात कमी करता येणं शक्य आहे. त्यासाठी महिलांना ‘ब्रीदिंग अँड मेडिटेशन’ एक्सरसाईज आणि संगीताच्या मदतीनं मन आणि शरीर रिलॅक्स करण्यासाठी ही अ‍ॅप मदत करणार आहे.

पीरियड ट्रॅकर अ‍ॅप
स्त्रिया आपल्या व्यस्त दिनक्रमामध्ये दर महिन्याला येणार्‍या मासिक पाळीची तारीख विसरतात. ह्या अ‍ॅपद्वारे अशा महिलांना दोन दिवस आधीच पाळीविषयीची सूचना मिळू शकणार आहे. तसेच पाळीच्या लक्षणांची जसे ताप, मुरमं, डोकेदुखी यांची सूचना ही अ‍ॅप देते. शिवाय पीएमसी गोळ्यांचंही स्मरण करते.
सध्या देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी तरुण संशोधकांनी काही प्रभावी अ‍ॅप तयार केल्या आहेत. त्यापैकी काही सहजसोप्या अ‍ॅपच्या एका क्लिकवरून तुम्ही संकटांचे अ‍ॅलर्ट देऊ शकता…

सेफ्टीपिन अ‍ॅप
सेफ्टीपिन या अ‍ॅपमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने जीपीएस ट्रॅकिंग, एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, सुरक्षित स्थळांची यादी यांसारखी फायदेशीर फीचर्स आहेत. तुम्ही ज्या भागात आहात, तिथे जवळपास कुठली सुरक्षित स्थळं आहेत, याची यादी या अ‍ॅपमध्ये आहे. या जागांना गुणही देण्यात आलेत. एखाद्या असुरक्षित जागी युजर गेल्यास लगेचच त्यांना अ‍ॅलर्ट दिला जातो. सेफ्टीपिन अ‍ॅप इंग्रजी भाषेव्यतिरिक्त हिंदी आणि स्पॅनिशमध्येसुद्धा उपलब्ध आहे.

रक्षा अ‍ॅप
स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेली ही रक्षा अ‍ॅप त्यांना, रजिस्टर केलेल्या नंबरवर सुरक्षिततेबाबत अपडेट्स देते. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा फोन नंबर अलर्टसाठी रजिस्टर करावा लागतो. जेव्हा तुम्ही अडचणीत असता, तेव्हा या व्यक्तीला अ‍ॅलर्ट जातोच, पण तुमचे लोकेशनही कळू शकते. अडचणीच्या प्रसंगी फोन काही कारणाने बंद झाला किंवा नेटवर्क नसेल तर व्हॉल्युम बटण तीन सेकंद दाबल्यास आपण नोंदवलेल्या नंबरवर नोटिफिकेशन मिळते.

वुमन सेफ्टी
या अ‍ॅपद्वारे तुम्ही नोंदवलेल्या क्रमांकावर अपडेट मिळतात. संकटसमयी या अ‍ॅपवरच्या एका पर्यायावर क्लिक केल्यास, तुम्ही कुठे आहात हे रजिस्टर नंबरवर कळवलं जातं. त्यासोबत गुगल मॅपची लिंकही जाते. यात संकटाच्या वेळी दोन फोटो क्लिक करून सर्व्हरवर अपलोड केले जातात. यामुळे घटनेचा पुरावाही मिळतो.

स्मार्ट 24 x 7
महिला आणि ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी या अ‍ॅपवर पोलिसांचा विश्वास आहे. घटनेच्या वेळी हे अ‍ॅप आवाज रेकॉर्ड करते आणि फोटोही क्लिक करते. त्याचप्रमाणे संकटात असल्याचे अ‍ॅलर्टही तुम्ही रजिस्टर केलेल्या इमर्जन्सी फोनवर पाठवले जातात. या अ‍ॅपला कॉल सेंटरच्या मदतीने तुमच्या नंबरचे लोकेशन पाहता येऊ शकते. तुम्ही या अ‍ॅपवर नेमके बटण क्लिक करून अ‍ॅलर्ट पाठवू शकता.

बी सेफ
महिला सुरक्षेच्या या अ‍ॅपमध्ये असलेल्या गार्डियन अ‍ॅलर्टमुळे तुम्ही नोंदवलेल्या फोन नंबरवर तुमचे लोकेशन जीपीएसद्वारे पाठवले जाते. आपत्कालीन प्रसंगी तुमच्या फोनवर फेक कॉलचे अ‍ॅलर्ट येतात आणि तुमचे लोकेशन, व्हिडिओ रजिस्टर केलेल्या नंबरला नोटिफिकेशनद्वारे पोहोचवले जातात.

डॉक्स अ‍ॅप ; ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्म
एकीकडे तंदुरुस्त राहण्याबाबत सजग असलेली तरुण पिढी, व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्या आरोग्यासाठी क्वचितच डॉक्टरांशी संपर्क साधू शकते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन आय.आय.टी.चे माजी विद्यार्थी सतीश कनन आणि एन्बासेकर दिनदयालाने यांनी 2015 साली ‘डॉक्स अ‍ॅप’ (Docs App) नावाचे ऑनलाइन डॉक्टरी सल्ला देणारे अ‍ॅप सुरू केले. त्यावेळेस दरमहा केवळ 100 रुग्ण या अ‍ॅपवर ऑनलाइन सल्लामसलत करत, तेथे आज दरमहा 2 लाख रुग्ण 5000हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत.
लैंगिक विकार, वेदना व्यवस्थापन, मानसशास्त्र, त्वचाविज्ञान, इन्फेक्शन, वजन व्यवस्थापन इत्यादींसाठी रुग्ण या अ‍ॅपवर सल्ला घेतात. या अ‍ॅपद्वारे लोकांना घरच्या घरी आणि गोपनीयतेसह त्यांच्या आरोग्याच्या समस्येचे निराकारण करण्यासाठी ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहे.
संपूर्ण कुटुंबासाठी हवे तेवढे डॉक्टरी सल्ले, औषधांवर 30 टक्के सवलत, घरपोच औषध सेवा, लॅब टेस्टवर 60 टक्क्यांपर्यंत सवलत आणि लॅबटेस्ट सॅम्पल घरी येऊन नेण्याची सुविधा देखील ही अ‍ॅप पुरवते. वापरण्यास अतिशय सोपी आणि कमी वेळात मोठी मोठी कामं करणारी ही अ‍ॅपची सुविधा लगेचच डाऊनलोड करा. बघा तुमच्या शरीर व मनावरील लोड कमी होऊन तुम्ही रिलॅक्स व्हाल.