गौतमी देशपांडेने ऑनलाइन मागवलेले जेवण गेले चोरी...

गौतमी देशपांडेने ऑनलाइन मागवलेले जेवण गेले चोरीला, अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक अनुभव(Online Food Ordered By Gautami Deshpande Was Stolen, Actress Shared A Shocking Experience)

अनेकदा आपल्याला आपल्या धकाधकीच्या आयुष्यात घरची कामे करायला, किंवा स्वयंपाक करायला वेळ मिळत नाही. अशावेळी आताच्या आधुनिक काळात घरपोच जेवण पोहचवण्याची सुविधा सुरु झाली आहे. त्यामुळे कोणाला काही खायला घेऊन येण्यासाठी बाहेर जावे लागत नाही. एक फोन किंवा एका क्लिकवर जेवण मागवता येते. त्यासाठी सध्या स्विगी, झोमॅटो सारख्या ऑनलाइन अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पण या अॅपवरुन जेवण मागवल्यानंतर अभिनेत्री गौतमी देशपांडेसोबत एक विचित्र प्रकार घडला. तिने तो प्रकार आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री गौतमी देशपांडेने स्विगीवरुन तिरामीसु या इटालियन डेझर्टची ऑर्डर केली होती. ऑर्डर दिल्यानंतर १ तास होऊनही ती पोहचली नाही त्यामुळे डिलेव्हरी बॉयशी संपर्क करून तिने आपल्या पार्सलबद्दल चौकशी केली. त्यावेळी त्या डिलेव्हरी बॉयने तिला ते चोरी झाल्याचे सांगितले.


सुरुवातीला तो डिलेव्हरी बॉय आपल्याशी खोटं बोलत असल्याची तिला शंका आली त्यामुळे तिने त्याला जाब विचारला. पण नंतर त्याने आपल्या जवळचे पार्सल कसे चोरीला गेले याचा व्हिडीओ गौतमीला सेंड केला. गौतमीला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये डिलीव्हरी बॉय खरं बोलत असल्याचे तिच्या लक्षात आले. एका पेट्रोल पंपावर डिलीव्हरी बॉयने आपली गाडी उभी केली होती. गाडीपासून जराशा अंतरावर तो दूर गेलेला या व्हिडिओत पाहायला मिळतो. डिलेव्हरी बॉय दूर गेलेला पाहून गाडीजवळ असलेल्या दोन तरुणांनी स्वीगीच्या बॅग मधून पार्सलची चोरी केली आणि ते पार्सल घेऊन तिथून पळ काढला. डिलीव्हरी बॉयच्या हे लक्षात न आल्याने तो या चोरीपासून अनभिज्ञ होता.


या प्रकरणासंबंधी अधिक चौकशी केल्यानंतर पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर पार्सल चोरी झाल्याचे उघड झाले. चोरी करणाऱ्या दोन तरुणांचे चेहरे व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत.चोरी करताना ते दोघेही हसतानाही दिसत आहेत, हे पाहून गौतमीचा राग अनावर झाला. हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअऱ करताना तिने म्हटले की, एखाद्याचे जेवण असे चोरणे आणि त्यावर हसणे हे या लोकांसाठी किती लज्जास्पद आहे. असे म्हणत तिने त्या दोघा तरुणांवर आपला संताप व्यक्त केला. स्वीगीला टॅग करून तिने ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे.